DFHL कर्ज प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुणे पोलिसांकडून लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. कंपनीकडून घेतलेलं 65 कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही नोटीस धाडली आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने यासंदर्भात तक्रार नोंदवली होती.
ADVERTISEMENT
आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रा. लिमिटेडने 25 कोटींचं कर्ज घेतलं होतं. तर नीलम राणे या आर्टलाईन प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केली गेल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचप्रमाणे नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने DFHL कडून 40 कोटींचं कर्ज घेतलं होतं आणि त्याची देखील 34 कोटींपर्यंत थकबाकी आहे. DFHL संबंधित एजन्सीकडे या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही लुक आऊट नोटीस जारी केली आहे.
3 सप्टेंबरला ही लुक आऊट नोटीस पाठवण्यात आली आहे. यासंदर्भातलं पत्र छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमानतळ प्रशासनालाही पाठवलं आहे. आता या सगळ्याबाबत राणे कुटुंबीयांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे गुन्हे शाखा आयुक्तांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे तक्रार आली होती व त्यानंतर संबंधित न्यायालयाकडून आदेश आल्यानंतर लुकआऊट नोटीस जारी केली आहे. आम्ही नियमांचं पालन केलं आहे आणि नियमांप्रमाणे जी थकबाकी आहे ती पाहता DFHL कडून तक्रार करण्यात आली होती.
नारायण राणे यांनी जी जनआशीर्वाद यात्रा काढली होती त्यामध्ये नारायण राणे विरूद्ध शिवसेना यांच्यातला टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. त्यानंतर जेव्हा नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर वादग्रस्त शब्दांमध्ये टीका केली तेव्हा त्यांना अटकही करण्यात आली होती. यानंतर बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. सामना मध्ये भोकं पडलेला फुगा हा अग्रलेख लिहून सडेतोड आणि खरमरीत भाषेत अग्रलेख लिहून नारायण राणेंवर टीकास्त्र सोडण्यात आलं. तरीही नारायण राणे यांनी टीका करणं काही सोडलं नाही.
आता या सगळ्या संघर्षाचा परिणाम हा या कारवाईतून बघायला मिळतो आहे का अशीही चर्चा होते आहे. राणे कुटुंबीयांनी किंवा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबत काही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. आता या लुक आऊट नोटीसबाबत नितेश राणे काही भाष्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT