– मनिष जोग, जळगाव प्रतिनिधी
ADVERTISEMENT
माजी मंत्री आणि जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी आज जळगावात ५ ठिकाणी छापेमारी केली आहे. पुणे पोलिसांचं सुमारे ६० ते ७० जणांचं पथक आज जळगावात छापेमारीसाठी आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. मराठा विद्याप्रसारक संस्थेशी निगडीत वादात ही छापेमारी सुरु असल्याचं कळतंय.
काय आहे वादाची पार्श्वभूमी?
जळगावच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेवर गेल्या काही वर्षांपासून तानाजी भोईटे आणि दिवंगत नरेंद्र पाटील या गटामध्ये वर्चस्ववादाची लढाई सुरु आहे. तानाजी भोईटे यांचा गट हा गिरीश महाजनांच्या बाजूने तर नरेंद्र पाटील यांचा गट हा एकनाथ खडसेंच्या बाजूने मानला जातो. नरेंद्र पाटील यांच्या निधनानंतर Adv. विजय पाटील यांच्याकडे या गटाचं नेतृत्व आलं आहे.
राज्यात भाजपची सत्ता असताना संस्थेवर वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने गिरीश महाजन यांनी पाटील गटावर कारवायांचा बडगा उगारला.
संस्थेचा भूखंड हडप करण्याचा महाजनांचा डाव – पाटील यांचा आरोप
मराठा विद्या प्रसारक संस्थेचा जळगावात मोठा भूखंड आहे. गिरीश महाजन मंत्री असताना Adv. विजय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुण्यात मारहाण करण्यात आली होती. गिरीश महाजनांच्या माणसांनी पुण्यात आपलं अपहरण केल्याचाही आरोप विजय पाटील यांनी केला आहे. पुण्यातून सुटका झाल्यानंतर विजय पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतू गिरीश महाजन मंत्री असल्यामुळे तो गुन्हा दाखल करुन घेण्यात आला नाही असा आरोप विजय पाटील यांनी केला आहे.
कालांतराने विजय पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराबद्दल तक्रार दाखल केली, ज्यानंतर हा गुन्हा कोथरुड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या कारवाईत गिरीश महाजनांवर मोक्का अंतर्गत कारवाई होईल असा विश्वास Adv. विजय पाटील यांनी बोलून दाखवला आहे. दरम्यान पुणे पोलिसांच्या पथकाने आज गिरीश महाजन यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या भोईटे कुटुंबाची चौकशी करायला सुरुवात केली आहे. या कारवाईबद्दल पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. परंतू या कारवाईनंतर गिरीश महाजनांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.
ADVERTISEMENT