सिद्धूने ‘कॅप्टनची’ विकेट काढलीच, कशी आहे लढवय्या अमरिंदर सिंहाची राजकीय कारकीर्द?

मुंबई तक

• 12:40 PM • 18 Sep 2021

अमृतसर: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याने पंजाबमध्ये आता एक मोठं राजकीय संकट निर्माण झालं आहे. खरं तर नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासूनच पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला होता. ज्याची आज अखेर झाली आहे. त्यामुळेच राजकीय विश्लेषकांच्या मते, दोन नेत्यांमधील संघर्ष ही महत्त्वकांक्षेची लढाई आहे असं […]

Mumbaitak
follow google news

अमृतसर: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याने पंजाबमध्ये आता एक मोठं राजकीय संकट निर्माण झालं आहे. खरं तर नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासूनच पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला होता. ज्याची आज अखेर झाली आहे. त्यामुळेच राजकीय विश्लेषकांच्या मते, दोन नेत्यांमधील संघर्ष ही महत्त्वकांक्षेची लढाई आहे असं म्हटलं जात आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी जरी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरीही त्यांना कमी लेखण्याची चूक कुणीही करु नये. जरी सिद्धू हे जरी आपल्या बंडखोर वृत्तीसाठी ओळखले जात असले तरीही अमरिंदर सिंह हे राजकारणातील जुने-जाणते खेळाडू आहेत. तसंच त्यांच्यामागे जनाधारही आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला सिद्धू यांनी जरी कॅप्टन सिंह यांची विकेट काढली असली तरी आगामी काळात अमरिंदर सिंह हे त्यांच्यासमोर नव्या राजकीय अडचणी निश्चितच निर्माण करु शकतात.

जाणून घेऊयात अमरिंदर सिंह यांच्याविषयी सविस्तरपणे:

कॅप्टन अमरिंदर सिंग यांची गणना काँग्रेसच्या सर्वात मजबूत प्रादेशिक नेत्यांमध्ये केली जाते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसने पंजाबमध्ये 117 पैकी 77 जागा जिंकल्या होत्या आणि तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून दिली होती. तेव्हा काँग्रेसने फक्त शिरोमणी अकाली दल किंवा भाजपचाच पराभव केला नव्हतर तर आम आदमी पक्षाची स्वप्नेही चिरडून टाकली होती.

लष्करी पार्श्वभूमीचे कॅप्टन अमरिंदर राजकारणातील लढवय्ये

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे पटियालाचे दिवंगत महाराजा यादविंदर सिंग यांचे पुत्र आहेत. लॉरेन्स स्कूल सनावर आणि देहरादूनच्या दून स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जुलै 1959 मध्ये NDA अर्थात राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता.

डिसेंबर 1963 मध्ये तेथून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि नंतर 1963 मध्ये ते भारतीय सैन्यात सामील झाले होते. ते त्याच दुसऱ्या बटालियन शीख रेजिमेंटमध्ये तैनात होते, ज्यामध्ये त्यांचे वडील आणि आजोबा होते. राजकीय विश्लेषकांना असा विश्वास आहे की, लष्करी पार्श्वभूमीवर असलेले कॅप्टनर राजकीय पातळीवर इतक्यात हार मानणार नाहीत.

अमरिंदर हे फील्ड एरिया-इंडो-तिबेटन बॉर्डरवर दोन वर्षे कार्यरत होते. मात्र, लष्करातील त्यांची कारकीर्द ही फार छोटी होती. वडिलांची इटलीमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी 1965 च्या सुरुवातीला सैन्यातून राजीनामा दिला. कारण घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली होती.

पण याच वर्षी पाकिस्तानबरोबर युद्ध सुरू झाल्यानंतर लगेचच ते पुन्हा सैन्यात सामील झाले होते. एवढंच नव्हे तर अनेक युद्ध मोहिमांमध्ये देखील ते सहभागी झाले होते. पाकिस्तानसोबतचं युद्ध संपल्यानंतर त्यांनी 1966 च्या सुरुवातीला पुन्हा लष्कराची नोकरी सोडली होती.

राजकारण आणि कॅप्टन अमरिंदर सिंह

कॅप्टन अमरिंदर सिंह यांची राजकीय कारकीर्द खासदार म्हणून जानेवारी 1980 मध्ये सुरू झाली. स्वाभिमानी स्वभावाचे अमरिंदर सिंह म्हणून राजकारणात ओळखले जात होते. 1984 साली ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ दरम्यान लष्कराने सुवर्ण मंदिरात प्रवेश केल्याने ते प्रचंड दुखावले गेले होते. याचाच निषेध म्हणून त्यांनी आपल्या खासदारकीचा आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.

ऑगस्ट 1985 मध्ये ते अकाली दलात सामील झाले होते आणि त्यानंतर 1995 च्या निवडणुकीत ते लोंगोवालचे आमदार म्हणून निवडून आले होते. सुरजीत सिंह बर्नाला यांच्या सरकारमध्ये ते कृषी मंत्रीही होते. नंतर त्यांनी पंथिक अकाली दलाची स्थापना केली होती. जे 1997 साली काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आलं. 1998 साली त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण यावेळी त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.

त्यानंतर 1999 ते 2002 पर्यंत अमरिंदर सिंह हे काँग्रेसच्या पंजाब युनिटचे प्रमुख होते. 2002 मध्ये पक्षाने विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि 2002 ते 2007 पर्यंत त्यांनी पंजाबचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. त्यानंतर ते 2013 पर्यंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते.

2014 साली मोदी लाट असूनही त्यांनी लोकसभा निवडणुकीत अमृतसर मतदारसंघातून भाजप नेते अरुण जेटली यांचा तब्बल एक लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता.

Amarinder Singh: पंजाबमध्ये मोठी उलथापालथ, कॅप्टन अमरिंदर सिंहांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

त्यानंतर 2017 साली काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाखाली पंजाब विधानसभा निवडणूक लढवली आणि एकहाती सत्ता देखील मिळवली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 4 वर्ष ते पंजाबचे मुख्यमंत्री होते. मात्र, पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह यामुळे त्यांना आपलं मुख्यमंत्री पद गमवावं लागलं. मात्र, असं असलं तरीही अमरिंदर सिंह हे सक्रीय राजकारणातून बाहेर पडणार नाहीत असं सध्या तरी बोललं जात आहे.

    follow whatsapp