अमृतसर: पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला याची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवालावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर, मुसेवाला याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेत मुसेवाला यांच्यासोबत असलेले आणखी दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर काळ्या रंगाच्या कारमधून आल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
मूसेवाला यांना गुंडांकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. असे असतानाही पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत मूसेवाला यांच्यासह 424 व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली होती. मुसेवाला यांनी आम आदमी पार्टीच्या विजय सिंगला यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या तिकीटावर पंजाब विधानसभेची निवडणूकही लढवली होती. यावेळी विजय सिंगला यांनी मानसा मतदारसंघातून मूसेवाला यांचा 63,323 मतांनी पराभव केला होता.
अल्टो कार हिसकावून आरोपी गेले पळून
सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून अल्टो कार हिसकावून घेतल्याचे सांगितले जात आहे. या कारचा क्रमांक HR-59-7648 असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी घटनास्थळी पांढऱ्या रंगाची बोलेरो दिसल्याचेही लोकांनी सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसेवाला यांच्या हत्येत एके-47 वापरल्याचा संशय आहे.
मनसा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ रणजीत राय यांनी सांगितले की, ‘तीन जणांना रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यापैकी सिद्धू मुसेवाला यांचा मृत्यू झाला. प्राथमिक उपचारानंतर दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी उच्च संस्थेत पाठवण्यात आले आहे.’
कोण होता सिद्धू मुसेवाला
17 जून 1993 रोजी जन्मलेला शुभदीप सिंग सिद्धू उर्फ सिद्धू मूसवाला हा मानसा जिल्ह्यातील मुसा वाला गावचा रहिवासी होता. मूसवालाचे लाखो चाहते आहेत आणि ते त्याच्या गँगस्टर रॅपसाठी लोकप्रिय होते. सिद्धू मुसेवाला याची आई गावाची सरपंच होती. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. महाविद्यालयीन जीवनात त्याने संगीताचं शिक्षण घेतलं आणि नंतर तो कॅनडाला गेला.
मूसवाला हा सर्वात वादग्रस्त पंजाबी गायकांपैकी एक म्हणूनही ओळखला जातो ज्याने खुलेआम बंदूक संस्कृतीचा प्रचार केला होता. तो प्रक्षोभक गाण्यांमध्ये गुंडांचा गौरव करायचा. सप्टेंबर 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘जट्टी जिओने मोड दी गुंतक वर्गी’ या गाण्याने 18व्या शतकातील शीख योद्धा माई भागोच्या संदर्भात वाद निर्माण केला होता. या शीख योद्ध्याची प्रतिमा डागाळल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आळा होता. मात्र, नंतर मुसेवाला यानी माफी मागितली होती.
पुणे: जेलरच्या मुलाची निर्घृण हत्या, तरुणीने केले कोयत्याने सपासप वार
मूसेवालाच्या ‘संजू’ या आणखी एका गाण्याने जुलै 2020 मध्ये वाद निर्माण केला होता. एके-47 गोळीबार प्रकरणात सिद्धू मुसेवालाला जामीन मिळाल्यानंतर हे गाणे रिलीज करण्यात आले होते. सोशल मीडियावर रिलीज झालेल्या गाण्यात त्याने स्वत:ची तुलना अभिनेता संजय दत्तशी केली होती. मे 2020 मध्ये, सिद्धू मुसेवाला यानो बर्नाला गावात गोळीबार केल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, नंतर संगरूर येथील न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता.
एकाही आरोपीला सोडले जाणार नाही: मुख्यमंत्री मान
‘या घटनेत सहभागी असलेल्या कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही’, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करून या घटनेबाबत असं म्हटलं आहे की, ‘सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येने धक्का बसला आहे. या हत्याकांडात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही. मी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करतो.’
राहुल गांधींनी व्यक्त केला शोक
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सिद्धू यांच्या हत्येवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘काँग्रेसचे आश्वासक नेते आणि प्रतिभावान कलाकार सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमुळे खूप धक्का बसला आहे आणि प्रचंड दु:ख झाले. माझ्या मनःपूर्वक संवेदना.’
ADVERTISEMENT