नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींचं नाव न घेता अतिशय उपहासात्मकरित्या टीका केली आहे. राहुल गांधींनी काही वेळापूर्वीच केलेलं एक ट्वीट सध्या बरंच चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर केलेल्या ट्वीटमध्ये काही नावं लिहली आहेत. त्याआधी त्यांनी ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘एवढ्या सगळ्या हुकूमशहांचं नाव ‘M’ वरुनच का सुरु होतं? आता आपल्याला हे समजलंच असेल की, राहुल गांधींना या ट्वीटमधून नेमका कुणावर निशाणा साधला आहे. आतापर्यंत राहुल गांधींनी अनेकदा पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधला आहे. पण यावेळेस त्यांनी उपहासात्मकरित्या ट्वीट केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या या ट्वीटची जरा जास्तच चर्चा रंगली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहलं आहे की, मार्कोस (फिलीपाईन्स), मुसोलिनी (इटली), मिलोसेविक (सर्बिया), मुबारक (इजिप्त), मोबुतू (कांगो), मुशर्रफ (पाकिस्तान), मिकोमबेरो (बुरुंडी) यांची नावं लिहून असं म्हटलं आहे की, एवढ्या सगळ्या हुकूमशहांचं नाव ‘M’ वरुन का सुरु होतं?
नवे कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलन यावरुन संपूर्ण देश अक्षरश: ढवळून निघाला आहे. यावेळी विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवलेली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी नवे कृषी कायदे रद्द व्हावे यासाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. अशावेळी विरोधकांकडून या मुद्द्यावरुन सरकार सातत्याने टीकेच्या फैरी सुरु आहेत.
राहुल गांधी हे सातत्याने कृषी कायद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर निशाणा साधत आहेत. दिल्लीच्या सीमेजवळील भागात पोलिसांकडून ज्याप्रकारे बॅरिकेडिंग केलं जात आहे त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींनी सरकारला प्रश्न विचारणं सुरु केलं आहे. दिल्लीच्या सीमेजवळ ज्याप्रकारे बॅरिकेडिंग केलं जात आहे, रस्त्यांवर खिळे लावले जात आहे यावरुन राहुल गांधींनी असं म्हटलं होतं की, ‘सरकारने पूल बांधायला हवे आहेत. भिंती नाही!’
दुसरीकडे, कृषी कायद्याशिवाय चीनबाबतचा मुद्दा, अर्थव्यवस्थेसंबंधी इतर मुद्दे यावरुन देखील काँग्रेसकडून सरकारला घेरलं जात आहे. सरकार कुणाचंही ऐकून घेत नाही किंवा चर्चा करत नाही. असेही आरोप काँग्रेसकडून केले जात आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आज नवं ट्वीट केलं आहे. आता राहुल गांधींच्या या ट्वीटला भाजपकडून नेमकं काय उत्तर मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT