राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, राज्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मान्सूनने परतीची वाट धरली असली, तरी महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येणार असून, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून पुढील दोन ते तीन दिवसातील पावसाबद्दलची माहिती दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील यलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांची माहितीही त्यांनी दिली आहे.
राज्यात पुढील 2 दिवस म्हणजे 16-17 ऑक्टोबर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, बंगालच्या उपसागरातील कमी दा़बाच्या क्षेत्राचा प्रभाव निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून विदर्भ, सलग्न मराठवाड्यातील भाग आणि उत्तर-मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
नाशिक, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गढचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
गुलाब चक्रीवादळानंतर महाराष्ट्र आणि देशातून मान्सूनने परतीचा मार्ग धरला. महाराष्ट्रातील बहुतांश भागातून मान्सून परतला आहे. राज्यातील विविध भागात धुके आणि दव पडू लागले असून, थंडीची चाहूलही लागली. मात्र, पाऊस होणार असल्यानं काही भागात उकाडा जाणवत आहे.
ADVERTISEMENT