राज्यात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे असून, हवामान विभागाकडून ऑरेंज आणि यलो अलर्टचा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यातील हवामानात मोठं बदल झाले आहेत. यामुळे राज्यात पुण्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
१७ ऑगस्ट रोजी असा असेल पाऊस…
हवामान विभागानं १७ ऑगस्ट रोजीच्या हवामानाबद्दल माहिती दिली आहे. राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केलेला आहे. यात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, वाशिम, अकोला, भंडारा या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट… १८ ऑगस्टला जोर वाढणार
सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ ऑगस्टला पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना यलो, तर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिगोंली, चंद्रपूर, वर्धा, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेले जिल्हे…
नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, यवतमाळ या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या पाच दिवसांच्या कालावधीत यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांशिवाय इतर जिल्ह्यात मध्यम ते तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT