मुंबई: सिनेसृष्टीत गेली अनेक दशकं आपली छाप सोडणारे सुपरस्टार रजनीकांत यांना आज (1 एप्रिल) मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर होताच रजनीकांत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रजीनकांत यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. ‘रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच आहे.’ असं म्हणत राज ठाकरेंनी रजनीकांत यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले
‘रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पथ निर्माण होतो, आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या ह्या अभिनेत्यांच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन.’ या शब्दात राज ठाकरेंनी रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची आज राजधानी दिल्लीत घोषणा केली. त्यानुसार रजनीकांत यांचा 51व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. आज महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे. रजनीकांत गेल्या 5 दशकांपासून सिनेमा क्षेत्रावर राज्य करत असून आणि लोकांचं मनोरंजन करत आहेत. यामुळेच यंदा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना देण्याचं निश्चित केलं आहे.’
सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
यावेळी सिलेक्शन ज्युरींनी हा निर्णय घेतला आहे. या ज्युरींमध्ये आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चॅटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या पाचही जणांनी बैठक घेत रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची शिफारस केली.
दरम्यान, हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रजनीकांत यांनी ट्विटरवरुन सर्वांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, ‘मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल मी भारत सरकार, आदरणीय आणि प्रिय नरेंद्र मोदीजी. प्रकाश जावडेकर आणि ज्यूरी यांचे आभार. मी माझा हा पुरस्कार त्यांना समर्पित करु इच्छितो जे माझ्या आजवरच्या प्रवासाच्या हिस्सा राहिले आहेत. धन्यवाद.’
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; कंगना राणौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
रजनीकांत यांनी आतापर्यंत अनेक एकाहून एक सिनेमांमध्ये काम केलं आहे. दाक्षिणात्य सिनेमापासून बॉलिवूडपर्यंत अनेक सिनेमांमध्ये रजनीकांत यांनी आपली छाप सोडली आहे. रजीनकांत यांनी आतापर्यंत शेकडो सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण त्यांचे दरबार, 2.0, द रोबोट, त्यागी, चालबाज, अंधा कानून, कबाली, खून का कर्ज, दोस्ती दुश्मनी, इंसाफ कौन करेगा यासारखे बरेच चाहत्यांच्या आजही स्मरणात आहेत.
ADVERTISEMENT