वसंत मोरे, बारामती: औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भोंग्याच्या मुद्द्यावर कायम असल्याचं दिसून आलं. एवढंच नव्हे तर त्यांनी तीन तारखेनंतर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजविण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. पण आता राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे गेल्या 16 वर्षांपासून मनसेमध्ये कार्यरत असलेले दौंड शहरातील मनसेचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे.
ADVERTISEMENT
मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे. जमीर सय्यद हे गेल्या तीन वर्षांपासून मनसेचे शहराध्यक्ष पदावर होते.
हनुमान चालीसा आणि भोंग्याच्या मुद्द्यावरुन मनसेमधील मुस्लिम समाजातील कार्यकर्ते नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातूनच राजीनामा देत असल्याचे जमीर सय्यद यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी वाहतूक सेनेचे अध्यक्षपद पुणे जिल्हा कामगार सेना एसटी महामंडळाच्या सदस्य पदावर होतो असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेनंतर आम्ही नाराज असल्याचे सांगत राजीनामा दिल्याचे सय्यद यांनी सांगितले आहे. दरम्यान, याआधीही मनसेतील कल्याणमधील अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी याच कारणावरुन मनसेला रामराम केला आहे. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे त्यांचे मुस्लिम पदाधिकारी आणि मतदार दुरावण्याची शक्यता अधिक आहे.
औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे काय म्हणाले होते?
‘उत्तरप्रदेशमध्ये जर लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर माझ्या महाराष्ट्रात का नाही उतरवले जाऊ शकत? सगळेच्या सगळे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं पण आहे की, तुम्ही स्थानिक पोलिसांच्या परवानगीशिवाय तुम्ही लाऊड स्पीकर लावू शकत नाही. किती मशिदींकडे परवानग्या आहेत? कोणाकडेच परवानगी नाही.’
‘मला इथे कोणी तरी सांगितलं की, इथे संभाजीनगरमध्ये सहाशे मशिदी आहेत. बांगेची कॉन्सर्ट चालते की काय इकडे? फक्त संभाजीनगरमध्ये नाही संपूर्ण देशभर आहे हे. हे संपूर्ण देशातील लाऊडस्पीकर खाली आले पाहिजे. सगळ्यांना समान धर्म असला पाहिजे.’
‘रस्त्यावर येऊन तुम्ही नमाज पढता. कोणी अधिकार दिले तुम्हाला? माझी शासनाला विनंती आहे. आज तारीख एक आहे. उद्या तारीख दोन आहे. तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला काही विष कालवायचं नाही. पण चार तारखेपासून ऐकणार नाही. माझी महाराष्ट्रातील तमाम हिंदूंना विनंती आहे की, जिथे-जिथे यांचे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्यासमोर दुप्पट आवाजाने तुमची हनुमान चालीसा ही लागलीच पाहिजे.’
‘विनंती करुन समजत नसेल तर आमच्यासमोर दुसरा पर्याय उरत नाही. लाऊडस्पीकर तुमच्या धर्मात बसत नाही. जे सुप्रीम कोर्टाच नियम काय सांगतायेत ना.. त्या सुप्रीम कोर्टाच्या नियमात..’
(अजान सुरु झाल्याचा आवाज) ‘माझी पोलिसांना नम्र विनंती आहे. जर हे सभेच्या वेळेला बांग सुरु करणार असतील आपण आत्ताचा आत्ता तोंडात बोळा कोंबावा. यांना जर सरळसरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही.’
‘इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय की, त्यांनी आत्ताच्या आत्ता जाऊन हे बंद करा. आणि माझं म्हणणं आहे याबाबतीत की, त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल ना. तर एकदा काय ते होऊनच जाऊ द्या…’
‘अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही.. संभाजीनगरच्या पोलिसांना मी परत सांगतोय.. हे जर या पद्धतीने वागणार असतील यांना जर सरळ सांगून समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे ना ती यांना एकदा दाखवावीच लागेल. म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे की, यांची एकदा थोबाडं बंद करा. माझी संपूर्ण देशवासियांना विनंती आहे की, बिल्कुल मागचा पुढचा विचार करु नका. हे भोंगे उतरलेच पाहिजे.’
‘सगळ्या धार्मिक स्थळांवरचे भोगे… उद्या मंदिरांवरचे असले तरीही उतरले गेले पाहिजे. पण यांचे उतरले गेल्यानंतर..’
Raj Thackeray : ‘पुढे काय करायचं उद्या सांगतो’; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
‘आज ही परिस्थिती आहे की, अभी नही तो कभी नही.. माझी हिंदू बांधवांना विनंती आहे की, जर हे 3 तारखेपर्यंत ऐकले नाहीत तर हनुमान चालीस ऐकू आली पाहिजेच. पोलिसांकडून रितसर परवानगी घ्या. ती घ्यावीच लागेल. हा विषय कायमचा निकाली लागेल ही अपेक्षा करतो.’ अशी आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.
ADVERTISEMENT