वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेत शरद पवारांवर टीकेची झोड उठवली होती. यामध्ये ते असंही म्हणाले होते की शरद पवार हे नास्तिक आहेत त्यामुळे ते धर्माकडे त्याच अनुषंगाने पाहतात. राज ठाकरेंनी ही टीका केल्यानंतर बारामतीकर शांत थोडेच बसणार? बारामतीकरांनी राज ठाकरेंना शरद पवार आस्तिक आहेत हे दाखवण्यासाठी चक्क एक व्हीडिओच समोर आणला आहे.
काय आहे व्हीडिओत?
बारामतीकरांनी समोर आणलेल्या या व्हीडिओत शरद पवार हे बारामती तालुक्यातल्या कन्हेरीच्या मारूती मंदिरात दिसत आहे. कन्हेरी गावातला मारूती हे पवार कुटुंबीयांचं ग्रामदैवत. या मंदिरात वर्षात पाच-सहा वेळा शरद पवारही येत असतात. शरद पवार राजकारणात आल्यापासून म्हणजेच मागची जवळपास ६५ वर्षे कन्हेरीच्या मारूतीला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करतात.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील ज्या सदस्यांनी निवडणूक लढवली आहे त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ या मंदिरातून झाला आहे.
पवार कुटुंबीयांचे श्रद्धास्थान म्हणून या मारुती मंदिराची ओळख आहे. जवळपास साठ वर्षांपूर्वी शरद पवार यांचे बंधू आप्पासाहेब पवार यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे, अशी माहिती मंदिरातील पुजारी महादेव शिंदे यांनी दिली.
‘शरद पवार नास्तिक आहेत त्यामुळेच ते….’ राज ठाकरेंचा निशाणा
शरद पवार यांच्या सुनबाई सुनेत्रा पवार, शर्मिला पवार यांनी देखील शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कन्हेरी च्या मारुती मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पुरातन आहे. त्यामुळे अनेकांच्या श्रद्धा तिथे गुंतलेल्या आहेत. कन्हेरी जवळच काटेवाडी हे पवारांचं गाव असल्याने पवारांचा ग्रामदैवत म्हणूनच या मंदिरांची ओळख आहे. पवार कुटुंबीय हे मोठ्या श्रद्धेने या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. पवारांनी आतापर्यंत ज्या निवडणुका जिंकल्या त्या कन्हेरीच्या मारुती मंदिरात नारळ फोडल्यानेच अशी भावना देखील पुजारी शिंदे यांनी व्यक्त केली.
त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांना नास्तिक म्हणणं म्हणजे केवळ पोरकटपणा असल्याचे कन्हेरी आणि काटेवाडीचा ग्रामस्थांनी सांगितले.
ADVERTISEMENT