“पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे. तो सगळ्या देशाचा असला पाहिजे”, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाटा एअरबस प्रोजेक्ट गुजरातला गेल्याबद्दलची भूमिका मांडली. पंतप्रधान मोदींना राज ठाकरेंनी जबाबदारीची जाणीवही करून दिली.
ADVERTISEMENT
मुंबईत माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी टाटा एअरबस प्रोजेक्टबद्दल भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले, “बाहेर गेला म्हणजे गुजरातमध्ये गेला. माझी मागची सगळी भाषणं काढून बघितली तर माझं पहिल्यापासूनच मत असंच होतं की पंतप्रधान हे देशाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान मुलांसारखं असलं पाहिजे. महाराष्ट्रातील हा प्रकल्प बाहेर गेला असता आणि तो आसामला गेला असता, तर मला वाईट नसतं वाटलं.”
“प्रकल्प गुजरातला गेलाय, शेवटी देशातच आहे तो. पण, वाईट या गोष्टीचं वाटतंय की, जो प्रकल्प येतोय आणि बाहेर पडतोय तो गुजरातलाच जातोय. मला असं वाटतंय की, पंतप्रधानांनी स्वतः याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट गुजरातकडे जात असेल अन् राज ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतो तेव्हा त्याला संकुचित म्हणण्यासारखं काय आहे?”
“पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे. तो सगळ्या देशाचा असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे. प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजे. तिथल्या लोकांना घर सोडून जाण्याची गरज पडू नये. त्यातून देशाचाच विकास होईल.”
“आजही महाराष्ट्र हे राज्य उद्योगधंद्याच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत पुढेच आहे. महाराष्ट्र प्रगतीपथावर राहिलेलं आहे. उद्योगपतींना देखील महाराष्ट्र प्रथम क्रमांकांचं वाटत आलेलं आहे. त्याच्यामुळे असं नाहीये की गुजरातमध्ये फार चांगल्या सुविधा आहेत आणि महाराष्ट्रात नाहीयेत. या गोष्टीकडे राजकीय न पाहता देशाच्या विकासासाठी प्रत्येक राज्य मोठं करणं ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे.”
राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार
“आजची बैठक पक्षाच्या इतर संघटनाबद्दलची आहे. त्या संघटना बऱ्याच वर्षांपासून काम करताहेत. त्यांच्यातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे. संघटनात्मक आहे”, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.
“२७ नोव्हेंबरला मुंबईतल्या पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावला होणार आहे. नेस्को संकुलात. २७ तारखेचा मेळावा झाला की, मी कोकण दौऱ्यावर जाणार आहे. कोल्हापूरला देवीचं दर्शन घेऊन पुढे जाणार आहे”, असं राज ठाकरे पक्षाच्या बैठकीला जाण्यापूर्वी म्हणाले.
ADVERTISEMENT