कोरोनाच्या दोन लाटांच्या तडाख्यांनी जनजीवनाची कोलमडलेली घडी सुस्थितीत येताना दिसत आहे. दुसरी लाट ओसरली असून, राज्य सरकारने अर्थव्यवहाराला गती देण्यासाठी निर्बंधांचा फास सैल केला आहे. जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, आज नाशिक येथे माध्यमांशी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला. टोपे यांनी नवीन व्हेरिएंट आणि तिसऱ्या लाटेबद्दलची जनतेच्या मनातील भीती दूर केली.
ADVERTISEMENT
नाशिक दौऱ्यावर असताना राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना विविध मु्द्द्यांवर भूमिका मांडली. ‘कोरोनाची दुसरी लाट राज्यातून 100 टक्के संपलेली नाही. असं असलं तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. लसीकरण सगळ्यात महत्वाचं असून, मुंबईत 85 टक्क्यांपर्यंत लसीकरण पूर्ण झालं आहे’, अशी माहिती टोपे यांनी दिली.
‘अर्थकारण सुरू राहणं आवश्यक म्हणून परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यवसाय सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीतही लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल निर्णय घेण्यात आला. लहान मुलांच्या लसीकरणासाठी कॅडीला आणि कोव्हॅक्सिनचा वापर करणार आहे. 2 ते 18 वयोगटासाठी हा निर्णय घेतला असून, घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे’, असं आरोग्यमंत्री म्हणाले.
‘महाविद्यालयीन तरुणांचं लसीकरण हे मोठं आव्हान आहे. राज्यात 70 टक्के नागरिकांनी पहिला, तर 35 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत 9 कोटींवर राज्यात लसीकरण झाले आहे. मिशन कवचकुंडल अभियानाला दिवाळीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, देशातील लसीकरण नियोजनात महाराष्ट्राचा मोठा हातभार लागला. लसीकरणासाठी लोकांनी पुढे यावं’, असं आवाहनही राजेश टोपे यांनी नागरिकांना केलं.
‘कोरोनाचा नवीन व्हेरिएंट निर्माण झालेला नाही, हा एकप्रकारे दिलासाच आहे. त्याचबरोबर तिसरी लाट येईल अशी परिस्थिती आजतरी राज्यात कुठेही नाही’, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.
परीक्षा गोंधळावर राजेश टोपे म्हणाले…
‘आरोग्य विभागासाठी होत असलेल्या परीक्षा उमेदवारांना एकाच विभागात देता येईल. अनेक जागांसाठी एक उमेदवार पात्र असेल, तर त्या उमेदवाराने निर्णय घ्यावा की कोणत्या पदाची परीक्षा द्यायची आहे’, असं सांगत टोपे म्हणाले, ‘कोविडमुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्यात आली होती. यापुढे कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नाही. निवृत्तीचं 60 वर्ष वय कायम आहे. युवकांना संधी द्यायची आहे’, असंही टोपे यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT