‘शंभर खोके दिले तरीही हे सरकार पुन्हा येऊ देणार नाही’, शिंदे-फडणवीस सरकारवर राजू शेट्टी भडकले

मुंबई तक

• 11:29 AM • 18 Nov 2022

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झालेत. एफआरपीसह इतर मुद्द्यांवरून राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला. ‘दोन दिवस सुरू असलेलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन यशस्वी झालंय. राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करतेय, त्यामुळे उद्यापासून राज्यातील मंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जाब विचारतील, तसंच 25 नोव्हेंबर रोजी संपूर्ण […]

Mumbaitak
follow google news

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झालेत. एफआरपीसह इतर मुद्द्यांवरून राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला. ‘दोन दिवस सुरू असलेलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन यशस्वी झालंय. राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करतेय, त्यामुळे उद्यापासून राज्यातील मंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जाब विचारतील, तसंच 25 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली.

हे वाचलं का?

माजी खासदार राजू शेट्टी यांची कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद झाली. राजू शेट्टी म्हणाले, ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 7 नोव्हेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर ऊस तोडणी बंद आंदोलन केलं. हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

आंदोलनाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा प्रसाद मिळाला, पण या आंदोलनाकडे राज्य सरकारनं लक्ष दिलेलं नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकार दाद देत नाही. त्यामुळे या सरकारला अद्दल घडवण्याची वेळ आली आहे. आता मंत्र्यांना जाब विचारला जाईल. मंत्र्यांच्या दौऱ्याच्या ठिकाणी आणि त्यांच्या कार्यक्रमांमध्ये जाऊन शेतकऱ्यांची फौज मंत्र्यांना जाब विचारेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय.

राजू शेट्टींनी महाविकास आघाडीबरोबरच शिंदे-फडणवीस सरकारवरही डागली तोफ

“महाविकास आघाडी सरकारला एफआरपीचे दोन तुकडे करणारा कायदा केला. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीचे अनेक निर्णय रद्द केले किंवा बदलले, पण शेतकऱ्यांच्या हिताआड येणारा कायदा या सरकारनं सुद्धा बदललेला नाही.”

राजू शेट्टींनी शिंदे-फडणवीस सरकारकडे काय केल्या मागण्या?

“एकूणच सरकार कुठलेही असो, साखर कारखानदारांचे तळवे चाटणारच सरकार असते. गेल्या वर्षीच्या ऊस गाळप खर्चाचं शासनानं ऑडिट करावं. शेतकऱ्यांना प्रतिटन दोनशे रुपये द्यावेत, ऊस तोडणी महामंडळामार्फत मजूर पुरवावेत, ऊस तोडणी यंत्रणातील मुकादम पद्धत बंद करावी, साखर कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावेत, काटामारी पूर्णपणे थांबवावी आणि एफआरपीचे तुकडे करणारा निर्णय मागे घ्यावा, आदी मागण्या राजू शेट्टी यांनी केल्या आहेत.

“उत्पादक शेतकऱ्यांच्या या मागण्यांबाबत निर्णय घेतला नाही, तर शेतकरी स्वस्त बसणार नाहीत. एफआरपीचे तुकडे करणारा कायदा करून महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय. आता शिंदे-फडणवीस सरकारही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे या सरकारलाही अद्दल घडवण्याची वेळ आलीये. शिंदे फडणवीस सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाही, तर टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र केलं जाईल”, अशी भूमिका राजू शेट्टींनी मांडली.

“25 नोव्हेंबर रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं जाईल. त्यानंतरही सरकारने निर्णय घेतला नाही, तर ऊस उत्पादक शेतकरी या सरकारला अद्दल घडवतील. 50 खोक्यांचा दर काढून सरकार आणले गेले. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही, तर शंभर खोके दिले तरीही हे सरकार पुन्हा येऊ देणार नाही”, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय.

    follow whatsapp