महाविकास आघाडीतून राजू शेट्टी बाहेर पडणार? रविवारी मोठी घोषणा?

मुंबई तक

• 03:46 PM • 03 Apr 2021

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. ही बंडखोरी शमवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शिष्टाई यशस्वी ठरू शकलेली नाही. राजू शेट्टी यांच्याशी आमचा संपर्क आहे, त्यांच्या काही तक्रारी आहेत. भविष्यात त्यांचे समाधान करण्याविषयी […]

Mumbaitak
follow google news

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. ही बंडखोरी शमवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शिष्टाई यशस्वी ठरू शकलेली नाही. राजू शेट्टी यांच्याशी आमचा संपर्क आहे, त्यांच्या काही तक्रारी आहेत. भविष्यात त्यांचे समाधान करण्याविषयी आमची चर्चा झाली आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. राजू शेट्टी यांनीही उमेदवाराशी संपर्क साधला मात्र काही अडचणींमुळे त्यांचा अर्ज निघाला नाही असंही उत्तर जयंत पाटील यांनी दिलं आहे. मात्र राजू शेट्टी हे लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. एवढंच नाही तर रविवारीच यासंदर्भातली घोषणा केली जाईल अशीही माहिती समोर येते आहे.

हे वाचलं का?

पंढरपूर : JCB मधून मिरवणूक, ७६ जणांविरोधात गुन्हा दाखल

या सगळ्या गोष्टी घडल्याने आणि जयंत पाटील यांनी अशी प्रतिक्रिया दिल्याने राजू शेट्टींच्या मनात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. रविवारी राजू शेट्टी, रविकांत तूपकर यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील हे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना मोठा फटका बसण्याची शक्यताही आहे.

Sanjay Raut यांची ‘डिनर डिप्लोमसी’

सोलापूर जिल्हा हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २००९ मध्ये आमदार भारत भालके यांनी स्वाभिमानीकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला होता. तर २०१४ मध्ये प्रशांत परिचारक यांच्याकडून आमदार भारत भालके हे निसटत्या मतांनी पराभूत झाले होते. २०१९ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत सहभागी झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. मात्र राजू शेट्टी यांची या सरकारवरची नाराजी वारंवार समोर आली आहे. अतिवृष्टी काळातील तुटपुंज्या अनुदानावरून तर वीज तोडणीवरूनही शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीकडे संपूर्ण राज्यच लक्ष लागून राहिलं आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील असंतोष व्यक्त करण्याची संधी आहे आणि ती पंढरपूरच्या मतदारांना मिळाली आल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यामुळे या पोट निवडणुकीच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणातील अनेक समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केलं आहे. आता राजू शेट्टी हे नेमकं काय करणार महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp