राज्यसभा निवडणुकीची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असून, दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून बेरजेचं राजकारण सुरू आहे. मात्र, त्यातच आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिवसेनेचं टेन्शन वाढवलं आहे. बच्चू कडूंनी धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडलं आहे.
ADVERTISEMENT
राज्याचे राजकारण राज्यसभा निवडणुकीभोवती फिरताना दिसत आहे. आमदारांचा घोडेबाजार होणार नाही, याची काळजी घेत शिवसेना-भाजपकडून अपक्षाच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच बच्चू कडूंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाचा मुद्दा उपस्थित केलाय.
राज्यसभा निवडणूक : भाजपमुळे शिवसेनेनं आमदारांचं हॉटेल बदललं, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बच्चू कडूंनी राज्यसभा निवडणुकीवरून इशारा दिला. धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारनं करावी, अन्यथा त्याचे परिणाम राज्यसभेच्या मतदानावर दिसतली, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
“धान आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. केंद्र सरकारनं जे खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे, ते कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. पण आता केंद्र सरकारनं खरेदीसाठी हात वर केले आहेत.”
“धान उत्पादक शेतकरी ४ ते ५ लाख असून, केंद्र सरकार धान खरेदी बंद करत आहे. केंद्रानं खरेदी सुरू करावी, याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे,” बच्चू कडू म्हणाले.
राज्यसभा निवडणूक: मनसेच्या एकमेव आमदाराने सांगितलं कोणाला करणार मतदान!
“खरेदी होत नसेल तर, किमान चार हजार रुपये प्रति एकर मदत हरभरा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजे, असं न झाल्यास आम्ही राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा. आमचं मतदान भाजपला जाणार नाही, मात्र आघाडीला देखील शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करु,” असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना समर्थक लहान पक्ष, अपक्षांची बैठक
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदार, समर्थन करणारे लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू असणार का आणि त्यांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल.
राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीसांना कोरोना; मतदानाचं काय होणार?
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून मंत्रीपद मिळालेले बच्चू कडू आता चुरशीच्या लढतीवेळी शिवसेनेला धक्का देणार की, शिवसेना त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरणार? हे राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT