Mahavikas Aghadi महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दारात गेले आहेत. कारण राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. त्यामुळे या निवडणुकीत नवा ट्विस्ट येणार का? याची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, सतेज पाटील, अनिल देसाई, सुनील केदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी गेले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही तिथे उपस्थित आहेत. या सगळ्या चर्चेतून काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून जी धुसफूस सुरू होती त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांचं देवेंद्र फडणवीसांना भेटायला जाणं हे सूचक मानलं जातं आहे. महाविकास आघाडीने एक पाऊल मागे घेतलं आहे का? अशाही चर्चा आता रंगल्या आहेत. समझोता करण्यासाठी प्रस्ताव घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर गेले आहेत. अनिल देसाई, छगन भुजबळ, सतेज पाटील आणि सुनील केदार हे राज्य सरकारमधले महत्त्वाचे नेते फडणवीसांना भेटायला गेले आहेत.
सहावी जागा निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रात घोडेबाजार, म्हणजेच आमदारांच्या खरेदी-विक्रीचं राजकारण होऊ शकतं. त्या घोडेबाजाराला लगाम लावण्यासाठीची ही सुरूवात आहे असं म्हणता येईल.
अनिल देसाई, छगन भुजबळ, सुनील केदार या सगळ्यांनी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यायची ठरवली का? ही सगळी माहिती अद्याप समोर आलेली नाही. भाजपचे नेते धनंजय महाडिक हे निवडणुकीतून माघार घेणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे?
राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाली तर चांगलं होईल, देवेंद्र फडणवीस हे मॅच्युअर्ड नेते आहेत. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. आज महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटलं आहे. त्यानंतर काही चांगला मार्ग निघाला तर त्या निर्णयाचं स्वागतच करू. कारण मार्ग निघाला नाही तर महाराष्ट्रातलं वातावरण आणखी बिघडू शकतं. मतांसाठी आमदाराना पैशांचं प्रलोभन दाखवलं जातं आहे. कोट्यवधींचे आकडे समोर येत आहेत. हा एक प्रकारचा आर्थिक गैरव्यवहारच आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी याचा तपास केला पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला तर ही निवडणूक बिनविरोध होईल. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि मविआ नेत्यांमधली बैठक महत्त्वाची मानली जाते आहे.
ADVERTISEMENT