Shiv Sena vs Rane: ‘राणेंनी स्वत:ला महान समजणं बंद करावं’, ‘सामना’तून राणेंना सल्ला

मुंबई तक

• 02:40 AM • 26 Aug 2021

मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून सलग दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर आपल्या अग्रलेखातून राणेंना सल्ला देत डिवचण्यात देखील आलं आहे. ‘राणे यांनी स्वत:ला महान समजणं बंद केले तर त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या कोणत्याही औषधांशिवाय बऱ्या होतील व त्यांचा संसर्ग होण्यापासून भाजपही वाचेल. मोदी यांच्या केंद्रीय […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून सलग दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर आपल्या अग्रलेखातून राणेंना सल्ला देत डिवचण्यात देखील आलं आहे.

हे वाचलं का?

‘राणे यांनी स्वत:ला महान समजणं बंद केले तर त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या कोणत्याही औषधांशिवाय बऱ्या होतील व त्यांचा संसर्ग होण्यापासून भाजपही वाचेल. मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते महान किंवा असामान्य झाले असतील तर त्यांच्या डोक्यातील हवा मोदीच काढतील हे पक्के.’ असं म्हणत शिवसेनेने नारायण राणेंना एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे याचवेळी भाजपवर देखील त्यांनी टीका केली आहे.

पाहा सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • घरात व दारात भरपूर गांजाची शेती पिकवायची व त्याच गांजाचे सेवन करुन कुणावरही कसेही बकायचे हा सध्या अनेक राजकारण्यांचा धंदा झाला आहे. ही गांजाची शेती कायद्यानेच बंद केली पाहिजे व त्याची सुरुवात केल्याबद्दल महाराष्ट्राची जनता ठाकरे सरकारला धन्यवाद देत आहे. फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर त्यांचा नशा लवकरात लवकर उतरो हीच ‘अटल’चरणी प्रार्थना, दुसरे काय बोलायचे!

  • कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारुन पडण्याइतके सोपे नाही. हा महाराष्ट्र आहे, तरीही ‘वर आमचे सरकार आहे! महाराष्ट्र केंद्राशी काय संघर्ष करणार?’ अशी मस्तवाल व महाराष्ट्रविरोधी भाषा राणे नावाचे केंद्रीय मंत्री वापरतात. महाराष्ट्राच्या अस्मितेची इतकी नाचक्की महाराष्ट्राच्या दुष्मनांनीही कधी केली नव्हती. राणे हा ‘नॉर्मल’ मनुष्य नसल्यानेच त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखले. भाजपने आता तरी शहाणे व्हावे!

  • राणे यांना अटक होणे व त्यानंतर रस्त्यावर हंगामा होणे, कार्यकर्त्यांशी संघर्ष होणे, कार्यालयांवर हल्ला करणे हे आजपर्यंत कधीच झाले नव्हते. त्यास सर्वस्वी राणे व त्यांची तळी उचलून धरणारे भाजपमधील नतद्रष्ट जबाबदार आहेत. शिवसेना-भाजपमध्ये आतापर्यंत वादाचे अनेक विषय झाले, पण एकमेकांवर चाल करून जाणे असे प्रकार घडले नव्हते.

  • मुल्ला ओमरसारखे लोक भाजपात आले तर त्यांच्याही समर्थनासाठी डोक्याला तेल फासून ते उभे राहतील. त्यामुळे ही जबाबदारी भाजपातील शहाण्यांवरच आहे. पुन्हा तेथे बाहेरून आलेल्या दीडशहाणे व अतिशहाण्यांची फौज निर्माण झाली आहे ती वेगळीच. त्यामुळे भाजपात अतिशहाणपणाचे जे अजीर्ण झाले ते राज्याच्या स्वच्छ वातावरणासाठी धोकादायक आहे. राज्यातील पर्यावरण कार्यकर्त्यांसाठी हे आव्हान आहे.

  • राणे यांनी स्वतःला महान समजणे बंद केले तर त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या कोणत्याही औषधांशिवाय बऱ्या होतील व त्यांचा संसर्ग होण्यापासून भाजपही वाचेल. मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते महान किंवा असामान्य झाले असतील तर त्यांच्या डोक्यातली हवा मोदीच काढतील हे पक्के. पंतप्रधान मोदी हेच त्यांच्या मंत्रिमंडळात सबकुछ आहेत. मंत्री येतात व जातात. मोदी हे स्वतःला फकीर समजतात व राणे ‘महान’ हा फरक समजून घेतला तर राणे हे केंद्रीय मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे ‘मेहमान’ आहेत याविषयी फडणवीसांच्या मनातही शंका नसावी.

  • ”राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचे वक्तव्य केले ते आम्हाला मान्य नाही, पण राणेंवरील कारवाई योग्य नाही,” हे विधान फडणवीस वगैरे लोक करतात ते कोणत्या आधारावर? अबलेवर एखाद्याने अत्याचार केला, पण त्याच्या मनात तशी काही विकृत भावना नव्हतीच हो, तेव्हा आरोपीला निर्दोष सोडा व पुढचे गुन्हे करण्यासाठी मोकळीक द्या, अशाच प्रकारचा हा युक्तिवाद आहे. काही काळ वकिली (फौजदारी) करणाऱ्या फडणवीसांकडून ही अपेक्षा नाही.

Narayan Rane आणि शिवसेनेमधील संबंध कसे बिघडले?; का आहेत कट्टर शत्रू?

  • राणे यांना पोलिसांनी पकडल्यावर राज्यात अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट असल्याचे म्हणणे हा राज्याचा अपमान आहे. फडणवीस व इतरांना राणे हे काय खान अब्दुल गफार खान वाटले काय? कायद्याने चाललेले राज्य मोडण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न आहेत, पण त्यांचे प्रयत्न चिरकूट पद्धतीचे आहेत. हे राज्य जितके आजच्या सत्ताधारी पक्षाचे आहे तेवढेच ते विरोधी पक्षांचेही आहे. तेव्हा राणे यांच्या अटकेनंतर भाजपवाल्यांना इतक्या मिरच्या झेंबण्याचे कारण नव्हते.

    follow whatsapp