राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यापासून सातत्यानं विधानसभेची मध्यावधी निवडणूक होणार असल्याची विधान राजकीय नेत्याकडून केली जात आहे. उद्धव ठाकरे, जयंत पाटलांसह अनेक नेत्यांनी मध्यावधी निवडणुकीचं भाकित केलेलं असतानाच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंही अशाच पद्धतीचं विधान केलंय.
ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथे एका कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना रावसाहेब दानवेंनी मोठं विधान केलं. “पूर्वी राजा पोटातून जन्माला यायचा. आता मतपेटीतून राजा निवडला जातो. राजकारणात तुमच्या अंगात किती सोने असेल, पण तुमच्यासोबत लोक नसतील तर तुम्हाला काहीच किंमत नाही. यासाठी राजकारण करायचे असेल तर तुमच्यासोबत लोक असली पाहिजेत”, असं दानवे म्हणाले.
पुढे बोलताना दानवे म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार जाईल असं कुणालाही वाटत नव्हतं. मात्र, अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळलं. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा”, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार लांबल्यानं शिंदे गटातील इच्छुक नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी मंत्रिपदाची इच्छा अनेकदा बोलूनही दाखवली आहे. सरकारमध्ये समन्वय नसल्याचा मुद्दा सातत्यानं राजकीय वर्तुळात उपस्थित होत असून, त्यात आता दानवेंनी केलेल्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे.
‘आम्हाला 20 ते 25 आमदारांचा छुपा पाठिंबा’, राऊतांना सल्ला देताना बावनकुळेंचं विधान
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणूका होऊ शकतात, असं राजकीय भाकीत केलं होतं. उद्धव ठाकरेंनी राजकीय घडामोडींचा हवाला हे विधान करताना दिला होता. रावसाहेब दानवे यांच्या विधानातही तोच सूर आहे. ‘सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही’, असं म्हणत दानवेंनी या परिस्थितीकडे लक्ष वेधलंय. तर ‘जनतेची कामे करा’, असंही म्हटलंय. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणूका लागू शकतात, ही चर्चा पुन्हा सुरू झालीये.
ठाकरेंच्या आमदाराला दानवे म्हणाले, ‘तुम्हाला परत एकदा गुवाहाटीला जावे लागेल.’
शिवसेनेतल्या बंडानंतर ठाकरे गटात राहिलेल्या आमदार उदयसिंह राजपूत यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एक विधान केलं. ज्याची सध्या चर्चा सुरूये. रविवारी एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे आणि उदयसिंह राजपूत एकत्र दिसले. त्यावेळी राजपूत यांनी सांगितले की, ‘आपले सरकार आले आणि माझ्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आली. इतरांची स्थगिती उठवली, तेवढी माझी स्थगिती उठवा, अशी मागणी आमदार राजूपत यांनी दानवे यांच्याकडे केली. त्याला उत्तर देताना दानवे म्हणाले, ‘आपण जर गुवाहाटीला गेला असता, तर तालुक्यातील विकासकामांना स्थगिती मिळाली नसती. कन्नड तालुक्याच्या विकासकामांवरील स्थगिती उठवायची असेल, तर तुम्हाला परत एकदा गुवाहाटीला जावे लागेल’, असं उत्तर दानवेंनी दिलं.
ADVERTISEMENT