१९२५ मध्ये RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दरवर्षी नागपूरच्या रेशीमबाग मैदानात संघ त्यांचा स्थापना दिवस साजरा करतो. हा स्थापना दिवस अत्यंत भव्य पद्धतीने साजरा केला जातो. या कार्यक्रमात दरवर्षी एक प्रमुख अतिथी बोलवले जातात. या वर्षी प्रमुख अतिथी म्हणून एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला संतोष यादव यांना बोलवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रचणार अनोखा इतिहास
संतोष यादव यांना बोलवल्याने संघ अनोखा इतिहास रचणार आहे. कारण संघाच्या दसरा उत्सवात पहिल्यांदाच प्रमुख पाहुण्या म्हणून संतोष यादव या महिला असणार आहेत. १९३६ मध्ये संघाने राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. त्यावेळी लक्ष्मीबाई केळकर यांना बोलावलं गेलं होतं. मात्र तेव्हापासून आत्तापर्यंत एकदाही संघाच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात महिला प्रमुख पाहुण्या नव्हत्या.
५ ऑक्टोबरला पार पडणार संघाचा स्थापना दिवस
५ ऑक्टोबरला दसरा आहे त्यामुळे याच दिवशी संघाचा स्थापना दिवस नागपूरच्या रेशीम बाग मैदानात पार पडणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे आधी शस्त्रपूजा करतील. त्यानंतर संघाचं संचलन पार पडणार आहे. या संचलनानंतर प्रमुख पाहुण्या संतोष यादव या उपस्थित स्वयंसेवकांपुढे त्यांचे विचार मांडतील. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण होणार आहे.
कोण आहेत संतोष यादव?
संतोष यादव या अशा महिला आहेत ज्यांनी एकदा नाही तर दोनदा एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे. १९९२ आणि १९९३ अशा सलग दोन वर्षांमध्ये त्यांनी ही कामगिरी केली. हरयाणा येथे वास्तव्य करणाऱ्या संतोष यादव यांनी सामाजिक बंधनं असूनही आधी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर आपल्या नावावर हे रेकॉर्ड रचलं. २००० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं आहे.
विजयादशमीच्या दिवशी संघाचा स्थापना दिवस
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस विजयादशमीच्या दिवशी साजरा केला जातो. १९२५ ला RSS ची स्थापना झाली होती. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली होती. या वर्षी या स्थापनेला ९७ वर्षे पूर्ण होतील. हेडगेवार हे संघाचे पहिले सरसंघचालक होते. त्यांच्यानंतर गुरूजी गोळवलकर यांना ही जबाबदारी देण्यात आली. सध्या RSS चे सरसंघचालक हे मोहन भागवत आहेत. ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी ते प्रमुख अतिथी संतोष यादव यांच्या भाषणानंतर देशाला संबोधित करतील.
ADVERTISEMENT