भारतीय प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.
ADVERTISEMENT
यावेळी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या.
शुभेच्छा संदेशात काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून थोर स्वातंत्र्यसेनांनींसह अनेकांनी सर्वस्वाचा त्याग केला. अगणित वीरांनी हौतात्म्य पत्करलं. त्या सगळ्यांना अभिवादन करताना विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील एकात्मता अखंड रहावी यासाठी वचनबद्ध व्हावं लागेल. आव्हानं येतच असतात, मग नैसर्गिक असोत किंवा मानवनिर्मित असोत. त्यांना परतवून लावण्याच्या हिंमत ही आपल्याला बाळगावीच लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने एकदिलाने काम करावे लागेल.
वैभवशाली अशा या देशाचा प्रजासत्ताकाचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवत असताना आपल्याला त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदेल याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. नैसर्गिक साधन संपत्ती, पर्यावरण आणि मानवाचा विकास यांचाही समतोल साधावा लागेल. आपण त्यासाठी निर्धार केला पाहिजे. यातूनच आपल्या देशाचं प्रजासत्ताक आणखी बलशाली होईल असा विश्वास मला वाटतो. हिंदुस्थानच्या प्रजासत्ताक वर्धापन दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा! स्वातंत्र्य मिळण्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या, त्याग करणाऱ्या, समर्पण करणाऱ्या शूरवीरांना अभिवादन!
आज संपूर्ण देशभरात 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. भारतीय स्वातंत्र्याचं 75 वं वर्ष असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रजासत्ताक दिन आठवडाभर म्हणजेच 23 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत साजरा केला जाणार आहे. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती होती, तर 30 जानेवारीला शहीद दिवस आहे.
हा प्रजासत्ताक दिन यासाठीदेखील विशेष आहे कारण, इतिहासात प्रथमच या संचलनात 75 विमानांचा फ्लाय पास्ट होणार आहे. तसंच 75 मीटर लांबीच्या 10 स्क्रोलचे (सांस्कृतिक नृत्य) प्रदर्शन यासारखे कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान फ्रान्ससारखा हल्ला होण्याची भीती असल्याने 27 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT