लंडन (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांची आज ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये किंग चार्ल्स यांनी सुनक यांची देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त केली. पंतप्रधानपदी नियुक्ती होताच किंंग चार्ल्स यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले. त्यानंतर सुनक तात्काळ कामाला लागले असून त्यांनी लिझ ट्रस यांच्या जुन्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे.
ADVERTISEMENT
ऋषी सुनक यांनी लिझ ट्रस यांच्या जुन्या मंत्रिमंडळातील व्यापार सचिव जेकब रीज-मॉग, न्याय खात्याचे सचिव ब्रॅन्डन लिवाइज आणि विकास मंत्री विकी फोर्ड यांना राजीनाम्याचे आदेश दिले आहेत. तर जुन्या मंत्रिमंडळातील जेरेमी हंट हे सुनक यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपदी दिसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय आणखी काही नवे चेहरे मंत्रिमंडळात बघायला मिळू शकतात.
पंतप्रधानपदी नियुक्ती केल्यानंतर सुनक यांनी 10 डाउनिंग स्ट्रीटवरुन देशाला संबोधित केलं. आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी देशवासियांना सोबत मिळून काम करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, झालेल्या चुका सुधारण्यासाठी माझी निवड करण्यात आली आहे. मी नम्रतेनं ब्रिटनच्या लोकांची सेवा करत राहीन. एकत्रितपणे आपण अविश्वसनीय गोष्टी साध्य करू शकतो. आपण सर्व मिळून चांगले भविष्य घडवू.
कोण आहेत ऋषी सुनक?
लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आहेत. सुनक हे भारतीय वंशाचे असून त्यांचे आजी-आजोबा भारतीय होते. याशिवाय ते इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. त्यांनी अक्षता मूर्ती यांच्याशी लग्न केलं आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचंही नाव आघाडीवर होतं. मात्र त्यांनी आपलं नाव मागे घेतल्यानंतर सुनक यांची दावेदारी भक्कम झाली होती. त्यानंतर सुनक यांच्याविरोधात पेनी मॉर्डोंट हे उभे होते. मात्र सुनक यांना जवळपास १८५ संसद सदस्यांचं समर्थन मिळालं, तर पेनी मॉर्डोंट यांना केवळं २५ सदस्यांचा पाठिंबा होता.
ADVERTISEMENT