एखाद्या ठिकाणी गुन्हा करताना चोर आणि गुन्हेगार वेगवेगळ्या शक्कल लढवतात. पुण्यात असाच एक प्रकार पहायला मिळाला आहे. ज्यात वारजे माळवाडी भागात एका सोनाराच्या दुकानात चोरी करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून चोरट्यांनी त्याच्या शेजारील गाळा भाड्याने घेतल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी ते NDA रस्त्यालगत गणपती माथा येथे माऊल ज्वेलर्स नावाचं एक दुकान आहे. या दुकानात शुक्रवारी दुपारी अडीच ते पाच वाजल्याच्या दरम्यान भिंत फोडून चोरट्यांनी ३० लाख किंमतीचे दागिने पळवल्याचं समोर आलं आहे. दुकानाचे मालक दुकान बंद करुन घरी जेवणासाठी गेले असताना हा प्रकार घडला आहे.
चोरट्यांनी शेजारील दुकानाची भिंत फोडून सोनाराच्या दुकानात प्रवेश केला आणि दागिने पळवून पसार झाले. दुकानमालक जेवण संपवून दुकानावर परत आले असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी श्वानपथकाच्या सहाय्याने तपासाला सुरुवात केली आहे. चोरट्यांनी चोरी करण्यासाठी शेजारचं मोकळं दुकान भाड्याने घेत ही चोरी केल्याचं समोर आलं आहे. पोलीस सध्या आरोपींच्या शोधात आहेत.
ADVERTISEMENT