नाशिक: नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक गळतीमुळे प्राण गमवावे लागलेल्या 22 नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांच्या विरोधात 302 अंतर्गत गुन्हे दाखल करा, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करा व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
ADVERTISEMENT
दुर्दैवी कुटुंबीयांना आधार देणे गरजेचं आहे. राज्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरअभावी रुग्ण तडफडत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड धावपळ होत आहे. ठाकरे सरकारने नागरिकांना आधार द्यावा व कोरोना रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांचे हाल थांबवावं. असंही यावेळी नवनीत राणा म्हणाल्या.
नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
नाशिकच्या डॉ. झाकिर हुसैन रूगणालयात काल (21 एप्रिल) दुपारी 1 वाजेच्या सुमारास ऑक्सिजन टँकरमधून ऑक्सिजनची गळती झाल्याने 22 जणांचा मृत्यू झाला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनीही 22 रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या ठिकाणी अग्निशमन दलाचं पथक आणि पोलीसही तात्काळ दाखल झाले होते.
रूग्णालयात टँकची गळती ही साधारण अर्ध्या तासात रोखण्यात आली. पण तोवर 22 रुग्णांना मात्र आपले प्राण गमवावे लागले होते. या रूग्णालयात एकूण 150 पेक्षा जास्त रूग्ण हे ऑक्सिजनवर होते तर 15 रूग्ण व्हेंटिलेटरवर होते.
दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर रुग्णलयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तात्काळ पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. स्वत: पोलीस आयुक्तांनी इथं येऊन घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्था कायम राहील यासाठी प्रयत्न केले.
नाशिक ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची चौकशीसाठी सात सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने अहवाल दिल्यानंतर कारवाई केली जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजनची गळती झाल्याने झाकीर हुसैन रूग्णालयात 22 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेननंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाशिकच्या रूग्णालयाची पाहणी केली त्यानंतर राजेश टोपे यांनी या प्रकरणी सात सदस्यीय समिती नेमली जाईल असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT