‘भारतातील हिंदू-मुसलमान यांचे पूर्वज एकच आहेत. आपण भारतीय संस्कृतीचे वारसदार आहोत, पण ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर निर्माण केलं. तेव्हापासून आपण भांडण आहोत’, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलं. ‘देशाला अग्रेसर करण्यासाठी सर्वांना सोबत प्रयत्न करावे लागतील’, असं आवाहनही सरसंघचालकांनी केलं.
ADVERTISEMENT
ग्लोबल स्ट्रेटॅजिक पॉलिसी फाऊंडेशनतर्फे मुंबईत आयोजित “राष्ट्र प्रथम-राष्ट्र सर्वोतोपरी” विषयावरील परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू-मुसलमान ऐक्याचं आवाहन केलं.
‘सर्व भारतीयांच्या एकतेचा आधार आपली मातृभूमी व देशाच्या गौरवशाली परंपरा आहेत. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. आपल्या दृष्टीने हिंदू हा शब्द आपली मातृभूमी, पूर्वज आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रतिशब्द आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक भारतीय नागरिक हिंदूच आहेत, असं मानतो’, असं सरसंघचालक म्हणाले.
‘कोणाच्याही मताचा येथे अनादर होणार नाही. परंतु आपणास मुस्लिम वर्चस्वाचा नव्हे तर भारतीय वर्चस्वाचा विचार करावा लागेल. राष्ट्रहितास प्राधान्य देऊन त्यादिशेने अग्रेसर होण्याकरिता सर्वांना सोबत पुढे जावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
‘विदेशी आक्रमकांसोबत इस्लाम भारतात आला, हाच इतिहास आहे आणि तो तसाच सांगितला गेला पाहिजे. मुस्लिम समाजातील विवेकी नेतृत्वानं आततायी गोष्टींचा विरोध करायला हवा. कट्टरपंथीयांसमोर त्यांना आपली भूमिका ठामपणे मांडावी लागेल. हे कार्य निरंतर करावे लागेल. आपल्या सर्वांसाठी हा खडतर परीक्षेचा काळ आहे. जितक्या लवकर आपण हे कार्य आरंभ करू, तितकेच आपल्या समाजाचे नुकसान आपण टाळू शकू’, अशी भूमिका मोहन भागवत यांनी मांडली.
‘भारत भविष्यात महाशक्ती होईल, ते इतरांना घाबरविण्यासाठी नाही. तर तो विश्वगुरूच्या स्वरूपात विराजमान होईल. युगानुयुगे आपण जड आणि चेतन या दोघांच्या उत्थानासाठी प्रयत्नशील आहोत. हाच आमचा मूलभूत विचार असल्यामुळे आमच्यापासून कोणीही भयभीत होण्याची गरज नाही’, असंही सरसंघचालक म्हणाले.
ब्रिटिशांनी वैर निर्माण केलं…
‘ब्रिटिशांनी मुस्लिमांना सांगितलं की हिंदूसोबत राहून तुम्हाला काही मिळणार नाही. लोकशाहीत बहुमत असणाऱ्यांचंच चालत. त्यामुळे तेच (हिंदू) निवडून येतील. तेच सत्तेत बसणार. हिंदू तत्वज्ञानाचं जाळं आहे, त्यात तुमचा इस्लाम धर्म संपून जाईल. संपला का इस्लाम धर्म? जेव्हापासून भारतात इस्लाम आला, तेव्हापासून संपलाय का? भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही गेलाय का? सर्वच पदांवर मुस्लिम जाऊ शकतात. गेलेही आहेत. पण, भीती निर्माण करून ठेवली. दुसरीकडे हिंदूंना सांगितलं, हे (मुस्लिम) फारच कट्टर आहेत. त्यांच्या धर्मात मारायलाच सांगितलं गेलंय’, अशी भीती ब्रिटिशांनी हिंदूंना घातली’, असंही सरसंघचालक भागवत यावेळी म्हणाले.
‘ब्रिटिशांनी मुस्लिमांना चिथावल आणि हिंदूंनाही. दोघांमध्ये भांडण लावून दिलं. त्या भांडणातून एकमेकांवरचा विश्वास उडाला. त्यातून एकमेकांना दूर ठेवण्याची चर्चा करत आलोय. उपाय काय आहे, तर आपल्याला हे मुळातून बदलावं लागेल. मलमपट्टी करून होणार नाही. आपण भारतीय संस्कृतीचे वारसदार आहोत’, असं सांगत सरसंघचालकांनी ‘देशाला अग्रेसर करण्यासाठी सर्वांना सोबत प्रयत्न करावे लागतील’, असं आवाहन केलं.
ADVERTISEMENT