रशिया-युक्रेनमधील संघर्ष तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. शुक्रवारी रशियन लष्काराने युक्रेनची राजधानी कीवच्या सीमेवर धडक दिली होती. त्यानंतर आता दोन्ही देशात सुरू असलेल्या युद्धाचा ज्वर वाढला असून, कीवचा पाडाव करण्यासाठी रशियाने दोन मिसाईल डागल्या. त्यामुळे शहरात हाहाकार उडाला आहे. दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी देश सोडून न जाता रशियाशी लढणार असल्याची भूमिका घेतली आहे.
ADVERTISEMENT
रशियाकडून कीववर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. शनिवारी राजधानी कीवच्या दक्षिण-पश्चिम भागात रशियाने दोन मिसाईल हल्ले केले. कीवमध्ये अंदाधुंद गोळीबार सुरू असून, आकाशात रशियन लढाऊ विमानं घिरट्या घालताना दिसत आहे. त्यामुळे युक्रेनच्या नागरिकांमध्ये प्रचंड भीती वातावरण निर्माण झालं आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारासच गोळीबार सुरू झाल्यानं नागरिकांनी घरातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाण आसरा घेतला आहे.
रशियाने कीवमध्ये दोन मिसाईल हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. कीवमधील स्थानिक प्रशासनाने याची माहिती दिली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे रशियाने डागलेली मिसाईल नागरी वसाहतीतील बहुमजली इमारतीवर पडल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर आणखी एक मिसाईल राजधानीतील जुलियानी विमानतळावर कोसळली आहे. सध्या कीवमधील एका इमारतीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मिसाईल हल्ल्यामुळे इमारतीचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.
कीवमधील रहिवाशी इमारतील रशियाने डागलेली मिसाईल पडताना दिसत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बीएनओ न्यूजने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला असून, यात अचानक मिसाईल येऊन बहुमजली इमारतीवर कोसळते. त्यानंतर वीज कडाडल्यासारखा मोठा आवाज ऐकायला येत आहे. त्यानंतर धुराचे लोट आकाशाच्या दिशेने निघत असल्याचंही व्हिडीओतून दिसत आहे.
रशियाने आता युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असून, युक्रेनच्या लष्करात लोक स्वयंस्फूर्तीने दाखल होऊ लागले आहेत. स्वयंस्फूर्तीने युक्रेन लष्करात दाखल झालेले नागरिक शस्त्रास्त्रासह कीवच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. कीवच्या रस्त्यांवर हे नागरिक गस्त घालताना दिसले. लोक मोठ्या संख्येनं शस्त्र घेण्यासाठी येत स्वतःहून येत आहे.
रशिया-युक्रेन संघर्षात प्रचंड जीवित आणि वित्त हानी झाली आहे. दोन्ही देशांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात युक्रेनचे 137 नागरिकांनी प्राण गमावले आहेत. त्यात 10 लष्कराचे अधिकारी आहेत. त्याचबरोबर रशियाचे 1000 जवान मारले असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी केला आहे. रशियाचे 80 रणगाडे, 516 लष्करी गाड्या, 7 हेलिकॉप्टर, 10 लढाऊ विमानं आणि 20 क्रूझ मिसाईल नष्ट केल्याचंही युक्रेनचा दावा आहे. दुसरीकडे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे की, युक्रेन लष्कराची 211 तळ नष्ट केली आहेत.
ADVERTISEMENT