रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षामुळे जगावर युद्धाचे ढग तयार झाले होते. काही दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यासाठी सीमेवर सैन्याची जमवाजमव केली होती. परंतू इतर देशांच्या मध्यस्थीनंतर ही योजना थांबवण्यात आली. आजही युक्रेनच्या फुटीरतावादी भागांमध्ये युद्धजन्य परिस्थिती कायम आहे. अशातच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
युक्रेनच्या पुर्वेकडी डोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना रशियाने स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. रशियाच्या स्थानिक वृत्तवाहिनीवरुन पुतीन यांनी देशवासियांना संबोधित केलं. रशियाने उचललेल्या या पावलामुळे आगामी काळात दोन्ही देशांमधला संघर्ष आणखी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत.
देशवायिसांना केलेल्या संबोधनात पुतिन यांनी युक्रेनलाही थेट धमकीवजा इशारा दिला आहे. युक्रेनने शत्रुत्वाचा विचार बाजूला ठेवावा अन्यथा होणाऱ्या परिणामांना भोगण्यासाठी तयार रहावं असं पुतीन म्हणाले. रशियाच्या या घोषणेनंतर आगामी काळात परिस्थिती आणखी बिघडू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
यावेळी पुढे बोलत असताना पुतीन म्हणाले की, “डोनेत्स्क पिपल्स रिपब्लिक आणि लुहान्स्क पिपल्स रिपब्लिक यांच्या स्वतंत्रता आणि सार्वभौमत्व या विषयावर मुद्दा बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. यावर तात्काळ निर्णय घेणं आवश्यक आहे.” युक्रेन अमेरिका केंद्रित ‘नाटो’ देशांच्या गटात सामील झाला तर रशियाच्या सुरक्षिततेसाठी ते अत्यंत धोक्याचे असेल, असेही पुतिन यांनी म्हटले आहे.
यापूर्वी युक्रेनमधील फुटीरतावादी नेत्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना पूर्वेकडील भागांना स्वतंत्र बहाल करा आणि मित्रत्वाच्या करारावर सही करण्यासाठी पुढे या असं आवाहन केलं होतं. यावेळी युक्रेनच्या सैन्याकडून होणाऱ्या आक्रमणाविरुद्ध फुटीरतावादी नेत्यांनी मदत मागितली होती. या नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर पुतीन यांनी ही घोषणा केल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT