शर्जिल उस्मानीवरून भाजपने थेट रस्त्यावर उतरण्याची भाषा केलीय. दुसरीकडे आज सामनातूनही याच मुद्यावरून शर्जिलला बेड्या पडतील, असं म्हणत शिवसेनेने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना उलट सवाल केलेत.
ADVERTISEMENT
शर्जिलसारखे कित्येक किडे-मकोडे आले आणि गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. समस्त हिंदू समाजाला अपमानित करणे हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे. शर्जिलसारखे साप अलिगढच्या बिळातच काय, तर पाताळात लपून बसले तरी त्याला खेचून आणण्याची हिंमत महाराष्ट्र पोलिसांत आहे हे काय फडणवीस यांना माहीत नाही?, असा सवाल शिवसेनेने केलाय.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटलंय, ‘तेसुद्धा कालपर्यंत राज्यकर्ते होतेच. त्यांच्या मनात तरी महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेविषयी शंका असू नये. शर्जिलला बेड्या पडतीलच. तुम्ही निश्चिंत रहा. ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. पण रस्त्यावर तीन महिन्यांपासून लढणाऱ्या हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या म्हणजे झालं.’
एल्गारच्या व्यासपीठावरून फक्त भडकवाभडवीच
सामनाने अग्रलेखाच्या सुरवातीलाच लिहिलंय, ‘कुणीतरी एक शर्जिल उस्मानी नावाचं कार्टं महाराष्ट्रात येऊन बरळलं आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही. ‘एल्गार’ नावाची एक टोळधाड पुण्यात जमा केली जाते. त्या व्यासपीठावरून फक्त भडकवाभडकवीच केली जाते. नाव एल्गार, पण वाजवायच्या हिंदुत्वविरोधी पिपाण्या.’
‘तो कोणीएक शर्जिल उस्मानी तेथे आला व त्याने आपल्या देशातलं हिंदुत्व कसं सडलं आहे यावर प्रवचन झोडलं. त्यावर भाजपने आता आरोळ्या ठोकायला सुरवात केलीय. हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, असा आतडी पिळवटून टाकणारा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.’
पण इतकी आदळापट करायची गरज नाही
‘फडणवीस यांचे म्हणणे असे आहे की, शर्जिलच्या मुसक्या बांधून महाराष्ट्रात आणावे. शाब्बास देवेंद्रजी! आपण सरकारची ‘मन की बात’च जाहीर केलीत. शर्जिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावे व त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळय़ांचीच इच्छा आहे, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही. हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, हा त्यांचा प्रश्न योग्यच आहे.’
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर नाहीच नाही, पण दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी 90 दिवसांपासून रस्त्यावर पडले आहेत. ते सर्व शेतकरी हिंदूच आहेत. त्या हिंदू, शीख शेतकऱयांना सन्मानाने घरी कधी पाठवणार ते सांगा, असा उलट सवाल सामनाने फडणवीसांना विचारला आहे.’
योगींच्या राज्यात, शर्जिललाही विशेष संरक्षण मिळणार नाही ना?
‘हिंदुत्व विरोधकांच्या मुसक्या महाराष्ट्र आवळेलच, पण थोडी जबाबदारी योगी राज्याचीसुद्धा आहे. त्या पळून गेलेल्या व लपून बसलेल्या शर्जिलला महाराष्ट्र पोलिसांच्या हवाली करण्याची जबाबदारी त्यांची आहे व याकामी कोणी हस्तक्षेप करू नये.’
‘कारण महाराष्ट्राने एखाद्या गुन्हेगारावर कारवाई करावी व इतर राज्यांतील भाजप शासकांनी त्या गुन्हेगारांना विशेष सुरक्षा कवच बहाल करावे, असे प्रकार अलीकडे वारंवार घडू लागले आहेत. शर्जिललाही विशेष संरक्षण मिळणार नाही ना?, ही शंका म्हणूनच आहे, असं म्हणत सामनाने योगींना टोला लगावलाय.’
ADVERTISEMENT