बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. या मुद्द्यांवरून गुजरात सरकारवर टीका होत असून, सर्वोच्च न्यायालयाने आता गुजरात सरकारबरोबरच केंद्र सरकारलाही नोटीस बजावली आहे. बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या मुक्ततेवरून रोखठोकमध्ये शंका उपस्थित करण्यात आली असून, ‘देशाला अतिरेक्यांपासून धोका आहे असे बोलण्यात अर्थ नाही. धोका तर देशातच आहे’, असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण देशात पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपींना गुजरात सरकार मुक्त केलं. गुजरात सरकारच्या या निर्णयावरून थेट केंद्रातील मोदी सरकारही टीकेचं धनी ठरताना दिसत आहे. आरोपींना तुरुंगातून सोडण्याचा निर्णयाचा संबंध गुजरात विधानसभा निवडणुकीशी लावला जात असून, सामनातील रोखठोक सदरातून यावर भाष्य करण्यात आलंय.
आपल्या हिंदू संस्कृतीत बसते काय?; रोखठोकमधून भाजपला सवाल
रोखठोकमध्ये म्हटलंय की, “आझादीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं गुजरात सरकारनं तुरुंगातील कैद्यांना सार्वजनिक माफीची घोषणा केली व बिल्किसच्या 11 गुन्हेगारांना ‘माफी’ देण्याचा निर्णय घेतला. हे सर्व गुन्हेगार बाहेर येताच त्यांचे सत्कार घडवून आणले गेले. त्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. हे सर्व आपल्या हिंदू संस्कृतीत बसते काय?”, असा सवाल रोखठोकमधून उपस्थित करण्यात आलाय.
“पंतप्रधान मोदी बोलतात, तसे वागत नाहीत”; शरद पवारांच्या विधानाचा संदर्भ देत टीका
“भाजपास जो हिंदुत्वाचा पुळका आहे, त्या हिंदुत्वात नारी शक्ती व महिलांचा सन्मान यास महत्त्व आहे. पण इथले हिंदुत्व बलात्काऱ्यांना अभय देणारे व त्यांचा सत्कार करणारे आहे. आश्चर्य असे, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात नारी शक्तीच्या गौरवाचा उल्लेख केला. पण त्यांच्या गुजरात राज्यातच एक बिल्किस बानो त्याच वेळी आक्रोश करीत होती.”
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विधानांचा संदर्भ देत रोखठोकमधून थेट पंतप्रधानांवरच निशाण्या साधण्यात आलाय. “पंतप्रधान जे बोलतात तसे वागत नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले. बिल्किस प्रकरणात ते सत्य ठरले”, असं सामना रोखठोकमध्ये म्हटलंय.
“बलात्कार व खुनास राजमान्यता व समाजमान्यता देण्याचा प्रकार घातक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा अधिरंजन चौधरी यांनी करताच स्मृती इराणींपासून समस्त भाजपास तो नारी शक्तीचा अपमान वाटला व न्यायासाठी ते सर्व तोंडाची घंटा वाजवीत राहिले. इराणी यांचा संताप पाहण्यासारखा होता. मग बिल्किस प्रकरणात या सर्व घंटा थंड का?”, असा सवाल भाजप नेत्यांना केला आहे.
बिल्किस बानो बलात्कार प्रकरण : गुजरात विधानसभा निवडणूक
“बिल्किस एक स्त्री आहे. तिने तिची इज्जत व स्वतःची मुलगी गमावली. त्या अन्यायाविरोधात ती एकाकी झुंजली. मोदी हे गुजरातला जातात तेव्हा त्यांनी या अत्याचारग्रस्त भगिनीच्या घरी जाऊन तिला आधार द्यायला हवा होता. प्रश्न इथे हिंदू-मुसलमानाचा नाही. तर हिंदुत्वाचा आत्मा आणि आपल्या महान संस्कृतीच्या प्रतिष्ठेचा आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत हिंदूंची मते मिळावीत म्हणून बिल्किसचे गुन्हेगार सोडले असतील तर ती प्रवृत्ती देशविघातक आहे. मग देशाला अतिरेक्यांपासून धोका आहे असे बोलण्यात अर्थ नाही. धोका तर देशातच आहे. धर्माचे रूपांतर धर्मांधता व अराजकतेत होत आहे”, अशा शब्दात रोखठोकमधून आरोपींची मुक्तता करण्याच्या निर्णयाचा समाचार घेण्यात आलाय.
ADVERTISEMENT