मुंबई: शिवसेना आणि शिंदे गटासह सर्वांचं लक्ष आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालाकडे लागले होते. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी उद्यावरती ढकलली आहे. कोर्टाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी कोर्टाच्या आजच्या सुनावणीवरती आपली प्रतिक्रिया दिली आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले सचिन सावंत सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीबाबत
”सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीतून शिंदे-फडणवीस सरकार इतके दिवस झाले तरी मंत्रीमंडळ विस्तार का करत नाही याचे कारण जनतेला कळले असेल.” असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला आहे तरी मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाहीये. त्यावरुन सचिन सावंतांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
सुनावणी सुरु होण्यापूर्वी काय म्हणाले रोहित पवार?
”सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. बंडखोर आमदारांचं काय होईल, सरकार कोसळेल की वाचेल यात सामान्य जनतेला रस नसून लोकशाही मूल्ये जपली जातील का? अनियंत्रित सत्तेला वेसण घातली जाईल का? संविधान टिकेल का? हे खरे प्रश्न असून त्याकडं सामान्य माणसाचं लक्ष आहे.” असं रोहित पवार म्हणाले होते.
दरम्यान एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक कायदेशीर पेच निर्माण झाले असून, यासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या तीन न्यायमूर्तींच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर ही सुनावणी उद्यावरती ढकलली आहे.
शिवसेना आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, अविश्वास प्रस्ताव आलेला असताना विधानसभा उपाध्यक्षांना कारवाईचे अधिकारांपासून ते केंद्रीय निवडणूक आयोगात होणारी सुनावणी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेनेच्या गटनेते पदी आणि प्रतोदपदी नियुक्त्यांना दिलेली मंजूरी आदी याचिका न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्या काय येणार, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
ADVERTISEMENT