-राकेश गुडेकर, रत्नागिरी
ADVERTISEMENT
शिवसेनेवर दावा सांगणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ‘बाळासाहेबांची शिवसेने’ची (balasahebanchi Shiv Sena) राज्यभर ताकद वाढण्यासाठी प्रयत्न करत असून, शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या कोकणात विशेष लक्ष दिलंय. 2024 आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात (guhagar assembly constituency) ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या विरोधात शिंदे गटाने रणनीती आखलीये आणि उमेदवारही निश्चित केलाय. 2024 मध्ये जाधवांविरुद्ध मैदानात असणार आहे, सहदेव बेटकर (Sahadev Betkar).
शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर भास्कर जाधवांचं पक्षात प्रमोशन झालं आणि त्यांच्याकडे नेते पदाची जबाबदारी आली. आता भास्कर जाधवांना मतदारसंघात घेरण्यासाठी शिंदे गटानं काम सुरू केलंय. खेड तालुक्यातील नांदगाव येथे झालेल्या सभेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते रामदास कदम यांनी सहदेव बेटकर यांच्या नावाची घोषणा करत इरादे स्पष्ट केले.
‘2024 च्या विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघाचा आमदार हा बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाचाच असेल. त्याची जबाबदारी मी घेतली आहे. त्यामुळे कुणीही कितीही वल्गना करो, विजयाचा दावा करो, आमदार हा शिंदे गटाचाच असेल, ही काळ्या दगडावरची रेष आहे’, असं रणशिंग रामदास कदम यांनी या मेळाव्यात फुंकलं. तसेच ‘सहदेव बेटकर यांनी आतापासूनच कामाला लागावं’, असंही रामदास कदम यांनी यावेळी सांगितलं.
गुहागर मतदारसंघात सध्या भास्कर जाधव शिवसेनेचे आमदार आहेत. सलग तीन वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यात अनेक वेळा शाब्दिक चकमकी उडाल्या आहेत.
आता भास्कर जाधव यांना पुन्हा एकदा टक्कर देण्यासाठी गेल्या वेळी पराभूत झालेले सहदेव बेटकर यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्यानं बेटकर राष्ट्रवादीत गेले आणि निवडणूक लढले होते.
बेटकर यांनी भास्कर जाधव यांना चांगली टक्करही दिली होती, पण त्यांचा पराभव झाला. या मतदारसंघात कुणबी समाज मोठ्या संख्येनं आहे. त्यामुळे आपल्या समाजाचा फायदा बेटकर यांना या निवडणुकीत झाला, पण शेवटी विजय राजकारणात कसलेल्या भास्कर जाधव यांचा झाला. यावेळी भास्कर जाधव यांनी जवळपास 12 हजार मतांनी बेटकर यांचा पराभव केला होता.
पण, यावेळची लढत वेगळी असणार आहे, कारण बेटकर यांच्यासाठी दस्तुरखुद्द रामदास कदम मैदानात उतरले आहेत. रामदास कदम यांच्या खेड तालुक्यातील मोठा भाग हा गुहागर मतदारसंघात येतो. रामदास कदम यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. त्यामुळे बेटकर यांच्यासाठी ती जमेची बाजू असेल.
जोडीला भाजपचीही साथ मिळाली तर बेटकर यांची बाजू भक्कम होईल. तर दुसरीकडे निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहिली, तर भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीची साथ मिळू शकते. त्यामुळे भास्कर जाधव यांचीही बाजू भक्कम होईल. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात पुन्हा एकदा कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
कोण आहेत सहदेव बेटकर ? (Who is Sahadev Betkar)
सहदेव बेटकर हे मूळचे शिवसैनिक आहेत. 2017 मध्ये ते संगमेश्वर तालुक्यातील माखजन जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून निवडून आले होते. तर 2018 मध्ये जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समिती सभापती म्हणून त्यांची वर्णी लागली होती.
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. तुम्ही तयारीला लागा असंही आपणाला वरिष्ठांकडून सांगण्यात आल्याचं बेटकर यांनी त्यावेळी सांगितलं होतं. पण भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सहदेव बेटकर यांचं नाव मागे पडलं.
शिवसेनेकडून भास्कर जाधव यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे सहदेव बेटकर यांनी शिवसेनेचा तसेच जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेच्या भास्कर जाधव यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. आता राज्यात झालेल्या सत्ता समीकरणानंतर सहदेव बेटकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
गुहागर मतदारसंघाचा इतिहास (History Of guhagar assembly constituency)
1978 पासून गुहागर विधानसभा मतदारसंघावर जनता दल आणि त्यानंतर भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. भाजप म्हणजेच पर्यायाने नातू कुटुंबाचं वर्चस्व. 1980 चा अपवाद सोडल्यास 2009 पर्यंत या मतदारसंघावर राहिलं आहे.
2009 मध्ये युतीतील जागा वाटपामध्ये भाजपने हा मतदारसंघ तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्यासाठी शिवसेनेला सोडला होता. त्यानंतर भाजपला इथं घरघर लागली. डॉ. विनय नातू यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष निवडणूक लढवली.
रामदास कदम आणि डॉ. विनय नातू या दोघांमध्ये शिवसेना-भाजपची मतं विभागली गेली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांना एकप्रकारे इथं लॉटरी लागली. या निवडणुकीनंतर डॉ. विनय नातू पुन्हा भाजपमध्ये परतले.
2014 मध्ये विनय नातू यांनी भाजपकडून निवडणूकही लढवली. मात्र 2014 च्या निवडणूकित शिवसेना-भाजप वेगवेगळे लढले होते. यावेळी नातूंना पुन्हा अपयश आलं आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव निवडून आले. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत आले.
2019 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होती. त्यामुळे भाजपकडून हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला. शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहदेव बेटकर यांचा पराभव करत या मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक केली.
वर्ष – विजयी उमेदवार – पक्ष
1978 – डॉ. श्रीधर नातू – जनता दल
1980 – रामचंद्र बेंडल – काँग्रेस
1985 – डॉ. श्रीधर नातू – भाजप
1990 – डॉ. श्रीधर नातू – भाजप
1993 – डॉ. विनय नातू – भाजप (पोटनिवडणूक)
1995- डॉ. विनय नातू – भाजप
1999 – डॉ. विनय नातू – भाजप
2004 – डॉ. विनय नातू – भाजप
2009 – भास्कर जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस
2014 – भास्कर जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस
2019 – भास्कर जाधव – शिवसेना
ADVERTISEMENT