राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. कोरोनाचा प्रभाव केवळ बॉलिवूडवरच नाही मराठी इंडस्ट्रीवरही पहायला मिळतोय. मराठीतील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सलील यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत यासंबंधी माहिती दिलीये.
ADVERTISEMENT
सर्व काही काळजी घेऊन देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सलील यांचं म्हणणं आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली असून ट्विटमध्ये ते म्हणतात, “सर्वतोपरी काळजी घेऊनही आज माझी covid-19 टेस्ट positive आली आहे. घरीच isolate करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार treatment सुरू केली आहे. गेल्या एका आठवड्यात जे जे भेटले त्यांना कल्पना असावी ह्या दृष्टीने ही पोस्ट”
दरम्यान काही दिवसांनी अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तर नुकतंच त्या दोघांनी रिकव्हर झाल्याचीही माहिती दिली आहे. मात्र एकंदरीत कोरोनाचं सावट पुन्हा एकदा सिनेइंडस्ट्रीवर पडताना दिसतंय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बॉलिवूड सिनेमांची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आलीये. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांचा चेहरे सिनेमा एप्रिलमध्ये रिलीज होणार नसून तो रिलीजसाठी पुढे ढकलण्यात आलाय.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने काही नियम लागू केले आहेत. यामध्ये थिएटर्स रात्री 8 ते सकाळी 7 बंद राहणार आहेत. तर राज्यात कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊन लागणार का असा प्रश्नही उपस्थित होतोय. असं झाल्यास पुन्हा एकदा मालिका तसंच सिनेमांच्या शूटींगवर गदा येण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT