बॉलिवूडचा दबंग खान अशी ओळख असलेल्या सलमान खान संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खानला मारण्याची सुपारी गँगस्टर लाँरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. बिश्नोई गँगच्या रडारवर सलमान गेल्या काही महिन्यांपासून आहे. या गँगने सलमानला दोनदा टार्गेट करण्याचा कट आखला होता अशीही माहिती समोर आली आहे. दोन्ही वेळा सलमानला ठार करण्याचा प्रयत्न हाणून पडला. पंजाब पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
सलमान खानची हत्या करण्याचा कट नेमका काय होता?
सिद्धू मुसेवालाची हत्या होण्याआधी लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला ठार करण्यासाठी प्लान B तयार केला होता. या प्लानमध्ये गोल्डी बराड आणि कपिल पंडित हे लॉरेन्स गँगचे दोन शूटर सहभागी होते. यापैकी एकाला काही दिवसांपूर्वीच नेपाळ बॉर्डवरवरून अटक करण्यात आली आहे. मुंबईतल्या पनवेलमध्ये कपिल पंडित, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि दोन शार्प शूटर एक भाड्याची खोली घेऊन थांबले होते.
पनवेलमध्येच सलमान खानला संपवण्याचा कट होता
पनवेलमध्ये सलमान खानचं फार्म हाऊस आहे. सलमान खानला याच फार्म हाऊसवर ठार करण्याचा कट आखण्यात आला होता. या फार्महाऊसमध्ये शिरायचं आणि सलमान खानला ठार करायचं असं ठरलं होतं. सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकीही करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोईच्या या शूटर्सनही ते ज्या खोलीत राहात होते तिथे सलमानवर हल्ला करण्यासाठी छोटी हत्यारं, पिस्तुल, काडतुसं सगळं तयार ठेवलं होतं.
हिट अँड रन प्रकरणात सलमान खान अडकला तेव्हापासून त्याच्या कारचा स्पीड कमी असतो ही माहितीही बिश्नोई गँगने मिळवली होती. तसंच सलमान खानसोबत अनेकदा त्यांचा PSO शेरा उपस्थित असतो. शूटर्सनी त्या रस्त्याचीही रेकी केली होती ज्यावरून सलमानची कार पनवेलच्या फार्म हाऊसला जाते. या रस्त्यावर बरेच खड्डे असल्याने सलमानच्या कारचा स्पीड २५ किमी प्रति तास या पेक्षा जास्त नसणार असंही त्यांना वाटलं होतं. तसंच लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शूटर्सनी फार्म हाऊच्या गाईडसोबतही सलमानचा फॅन असल्याचं सांगून मैत्री केली होती. सलमान कधी येतो? काय करतो याची माहिती मिळवण्याचा हा प्रयत्न होता.
सिद्धू मुसेवालाप्रमाणेच तुझा गेम करू
सिद्धू मुसेवाला प्रमाणेच तुला ठार करू असं सांगणारं आणि धमकी देणारं लेटर सलमान खानला मिळालं होतं. हे लेटर लाँरेन्स बिश्नोई गँगनेच पाठवलं होतं. जे सलमान खानचे वडील सलीम खान यांना मॉर्निंग वॉकच्या दरम्यान एका बेंचवर मिळआलं होतं. या पत्रात उल्लेख होता की सिद्धू मुसेवाला प्रमाणे सलमानची अवस्था करू. सलमान खान याप्रकरणी पोलिसात गेला. त्याने या प्रकरणात कुणावरही संशय व्यक्त केला नाही. मात्र यानंतर सलमान खानची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली.
सलमान खानवर का नाराज आहे लॉरेन्स बिश्नोई?
सलमान खानला मारण्याचा प्रयत्न दोनवेळा फसला आहे. अशात प्रश्न हा निर्माण होतो की सलमान आणि लॉरेन्स यांच्यात असं काय घडलं आहे की लॉरेन्स बिश्नोई त्याच्या जिवावर उठला आहे. याचं कारण आहे सलमान खानचं चिंकारा हत्या प्रकरण. लॉरेन्स बिश्नोई समाजाचा आहे. सलमान खानला चिंकारा हत्या प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं. लॉरेन्स बिश्नोई या शिकारीच्या प्रकरणामुळेच सलमान खानच्या मागे लॉरेन्स बिश्नोई हात धुऊन लागला आहे. आत्तापर्यंत त्याने दोनवेळा कट आखला होता पण यशस्वी झाला नाही.
ADVERTISEMENT