संजय राठोड आमदार असलेल्या दिग्रस मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी आज शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांचं स्वागत केलं. यावेळी संजय देशमुख यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगितली. तसेच आईसोबत झालेला संवादालाही उजाळा दिला.
ADVERTISEMENT
दिग्रस विधानसभा मतदारसंघाचं दोन वेळा प्रतिनिधित्व करणारे संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना भवनात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले.
पक्षप्रवेशानंतर संजय देशमुख म्हणाले, “मला शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश दिला, त्याबद्दल त्याचे आभार. याचं शिवसेना भवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. माझ्यासाठी आज आनंदाचा क्षण आहे. पक्षप्रमुखांनी माझ्या विनंतीला मान देऊन पक्षात घेतलं.”
“आपल्याला माहितीये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या. माझी ८० वर्षाची आई आहे. ती दवाखान्यात असताना टीव्ही बघत होती. त्या राजकीय घडामोडी माझ्या आईनं बघितल्या. मी माझ्या आईला विचारलं की, मी शिवसेनेत जाऊ का? माझ्या आईने मार्मिक उत्तर दिलं. आई म्हणाली, ‘संजय तुझी ओळखच शिवसेनेमुळे झालेली आहे’, असं तिनं सांगितलं”, असं संजय देशमुख पक्षप्रवेशावेळी म्हणाले.
“वाशिम-यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांचं मी अभिनंदन करतो. कोणतीही पदं मिळाली नाहीत. काही मिळालेलं नसताना तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलात. गेल्या अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंनी जे काम केलं, त्याची नोंद देश-विदेशात घेतली गेली. शिवसेना बळकट करण्यासाठी काम करू”, असा आवाहन संजय देशमुख यांनी पक्षप्रवेशानंतर केलं.
संजय राठोडांविरुद्ध उद्धव ठाकरेंची रणनीती! संजय देशमुखांच्या माध्यमातून देणार ‘शह’?
संजय देशमुख कोण आहेत?
संजय देशमुख यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतूनच सुरू झाली. शिवसैनिक आणि नंतर १९९९ मध्ये ते शिवसेनेचे यवतमाळचे जिल्हाप्रमुख झाले. पुढे दिग्रस विधानसभा मतदारसंघातून संजय देशमुख यांना शिवसेनेकडून तिकिट नाकारलं गेलं. त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत संजय देशमुख यांनी १२५ मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार ख्वाजा बेग यांचा पराभव केला. त्याचवेळी ते विलासराव देशमुखांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री बनले होते.
२००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय देशमुख दुसऱ्यांदा दिग्रस मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण ते पराभूत झाले. संजय राठोडांनीच त्यांचा पराभव केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय देशमुखांनी भाजपत प्रवेश केला. पण भाजप-शिवसेना युतीमुळे संजय देशमुखांना तिकीट मिळालं नाही आणि त्यांनी पुन्हा बंडखोरी करत संजय राठोडाविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यांना तब्बल ७५ हजार मतं मिळाली होती.
ADVERTISEMENT