वीर सावरकर यांच्याबाबत ढोंगी प्रेम दाखवू नका त्यांना भारतरत्न ही मागणी आम्ही सातत्याने करत आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मागणी करत आहोत. त्यांना भारतरत्न पुरस्कार का दिला जात नाही? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. वीर सावरकर हिंदूहृदय सम्राट होते, त्यांच्या नंतर बाळासाहेब ठाकरे हेच हिंदूहृदयसम्राट असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकरांवर राहुल गांधी यांनी जी टीका केली तो संदर्भ घेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली होती. वीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांच्या गळ्यात गळे घातले जात आहेत हे पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला स्वर्गात वेदना होत असतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता संजय राऊत यांनी वीर सावरकर यांना भारतरत्न का देत नाही? अशी विचारणा केली आहे.
बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम असेल तर त्यांनाही भारतरत्न द्या अशीही मागणी संजय राऊत यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची मशाल फक्त निष्ठावंतांच्या हातात असू शकते. कारण बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात निष्ठा आणि अस्मिता या शब्दाला महत्त्व प्राप्त करून दिलं. त्याचं तेज कुणालाही हिरावून घेता येणार नाही. शिवसेना प्रमुखांना जाऊन दहा वर्षे झाली आहेत. त्यांच्या नंतर काही जण शिवसेना तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता जे म्हणत आहेत की बाळासाहेब ठाकरेंचा विचार आमचा ते ढोंगी आहेत. बाळासाहेब ठाकरे यांन ढोंगाचा सतात तिरस्कार केला असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात ढोंगीपणा चालणार नाही
महाराष्ट्रात ढोंगीपणा चालणार नाही हे बाळासाहेब ठाकरेंनी सतत सांगितलं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांनी कधीही ढोंगीपणा आणि खोटेपणा यावर कायमच फटकारे ओढले. दुर्दैवा महाराष्ट्रात काही लोक आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत असं सांगत आहेत ते ढोंगी आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. तसंच असे ढोंगी लोक जनतेची दिशाभूल करत आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी
आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी असल्या ढोंगी लोकांची अवस्था खूप वाईट करून सोडली असती. बाळासाहेब ठाकरेंचे फटकारे त्यांची भूमिका यामुळे महाराष्ट्राला मजबुती मिळाली. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला बळ दिलं कारण ते हिमालयापेक्षा मोठे आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT