संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या आनंदी देशांच्या यादीत भारत १३६व्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान १२१व्या क्रमांकावर. आनंदी देशांच्या यादीतील भारताच्या घसरणीवरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तिखट सवाल करत भाजप आणि मोदींना टोले लगावले आहेत.
ADVERTISEMENT
संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून आनंदी देशांबद्दल भाष्य केलं आहे. भारताच्या झालेल्या घसरणीवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “आनंदी देशाच्या बाबतीत भारत १३६व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान, बांगलादेश आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहेत. पंतप्रधान मोदी हे निवडणुकांमागून निवडणुका जिंकतात, त्यांचा पक्ष विजयाचा आनंद साजरा करतो, पण तरीही देश आनंदी का नाही? ‘फिनलॅण्ड’ पहिल्या क्रमांकाचा आनंदी देश ठरला. त्यांचे राज्यकर्ते जनतेशी इमान राखतात, खोटे बोलत नाहीत. त्यामुळे राजा व प्रजा, दोघेही आनंदी आहेत!”, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
“देशाचे मोठेपण नेमके कशात असते आणि देशाचा आनंद कशात असतो, यावर एकदा संसदेत चर्चा व्हायला हवी. संसदेतील सर्वच चर्चा आता रटाळ होत आहेत. मोदी भक्तांची संख्या संसदेच्या सभागृहात वाढली आहे. त्यातील अनेकांना विनोदाचे, खिलाडूपणाचे वावडे आहे. त्यामुळे संसदेतील ‘आनंद’ संपला आहे.”
“चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष जिंकला. त्याचा आनंद सोहळा साजरा झाला; पण जागतिक आनंदी देशांच्या यादीत भारत १३६ व्या स्थानावर घसरला. पाकिस्तान आपल्यापेक्षा वरच्या स्थानावर म्हणजे 121 व्या क्रमांकावर आहे. भाजप जिंकला म्हणजे देश जिंकला, मोदी जिंकले म्हणजे देश आनंदी झाला, असे जग मान्य करायला तयार नाही,” असं म्हणत राऊतांनी भाजपला चिमटा काढला आहे.
“आमच्या देशात आनंदाच्या नावाने फक्त बोंब आहे. जगात सर्वात सुखी कोण याचा शोध कोणीच लावू शकलेला नाही. जगात अनेक श्रीमंत देश आहेत. ते आनंदी देशांच्या यादीत दिसत नाहीत. आनंदी राजकीय पक्ष व नेत्यांची यादी तयार केली तर त्यात भाजप व त्यांचे पक्ष तरी असतील काय? कारण सत्ता आणि हव्यास यावरच सुख आणि आनंदाची व्याख्या ठरत नाही.”
“भारतातील जनतेला ‘अच्छे दिन’ आणण्याचे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. ‘अच्छे दिन’ म्हणजे लोकांना आनंदी ठेवण्याचा वायदा. भाजप व मोदी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत गेले, पण देश आनंदयात्री बनला नाही. निवडणुका जिंकण्यासाठी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला, पण आनंदी देशांच्या यादीत पाकिस्तान आपल्या वर आहे. अयोध्येत राममंदिर उभे राहत आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने तुम्हाला मतदान केले, पण सर्वाधिक बेरोजगारी, गरिबी त्याच राज्यात आहे. कोविड काळात तर गंगेत प्रेतेच वाहत होती, पण आता योगींच्या चेहऱ्यावर आनंद आहे. तरीही त्यांचे मन दुःखी आहे. कारण मंत्रिमंडळातील यादी त्यांच्या मर्जीने बनली नाही. मग राज्य आनंदी कसे होणार?, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे.
“भरमसाट पैसे खर्च करून राज्यकर्त्यांनी जाहिराती केल्याने जनता आनंदी होत नाही. फिनलँडप्रमाणे ब्रिटनही तसा आनंदीच देश आहे, पण हा आनंद आणि मोठेपण कशात आहे? ब्रिटनचे मोठेपण हे मुकुट घालणाऱ्या त्यांच्या सम्राज्ञीत नाही, राजपुत्र चार्ल्समध्ये नाही, त्यांच्या भव्य महालात नाही, तर त्यांच्या स्वतंत्र बाण्याच्या संसदेत, जिवापाड जपलेल्या लोकशाहीत व घटनेत आहे. जगावरचे साम्राज्य गमावूनही ब्रिटन आनंदी आहे व युक्रेन बेचिराख करूनही पुतीन व त्यांचा रशिया दुःखी आहे. चार राज्यांत विजय पताका फडकवूनही भाजपच्या चेहऱ्यावर आनंद नाही व जनता, देश सुखी नाही. निवडणुका जिंकल्या, पण देश ‘आनंदी’ राहिला नाही.देश जिंकूनही राजा आनंदी नाही. मग प्रजा कशी आनंदी राहणार?”, असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीकेचे बाण डागले.
ADVERTISEMENT