शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. कारण ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यात सुरूवातीपासून सहभागी असल्याचा दावा करण्यात आला आहे. ईडीने आरोपपत्रात हे म्हटलं आहे की पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लाँड्रीग केलं आहे. यामध्ये प्रवीण राऊत संजय राऊत यांच्या वतीनेच काम करत होते असंही ईडीने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
संजय राऊत यांच्यामागे ED हात धुऊन का लागली आहे? पत्रा चाळ प्रकरण काय आहे?
२००६-०७ चा काय आहे संदर्भ?
२००६-०७ च्या दरम्यान संजय राऊत यांनी काही मिटिंग अटेंड केल्या होत्या. त्यातली एक बैठक तेव्हा केंद्रीय कृषी मंत्री असलेल्या शरद पवारांसोबत झाली होती. तर एक बैठक माजी मुख्यमंत्र्यांसोबत झाली होती. यानंतर या प्रकरणात राकेश वाधवानचा सहभाग स्पष्ट झाला. पत्राचाळ डेव्हलपमेंट संदर्भात हा सहभाग होता. ईडीने हे देखील म्हटलं आहे की प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि त्यांचेच प्रॉक्सी म्हणून काम करत होते. त्यामुळेच त्यांना गुरूआशिष कंपनीत आणण्यात आलं.
संजय राऊतांसाठी प्रवीण राऊत विमानांची तिकिटं, हॉटेल्स बुक करायचे; पत्नीला 55 लाखही पाठवले-ED
प्रवीण राऊत यांच्याकडे महत्त्वाचे अधिकार दिले गेले
प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याने ते कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करू शकत होते तसे अधिकार त्यांना देण्यात आले होते. म्हाडासोबत वाटाघाटी करण्याचं आणि सर्व सरकारी, निमशासकीय आणि स्थानिक प्राधिकरणांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्याची जबाबदारी प्रवीण राऊत यांच्यावर देण्यात आली होती. संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्याने प्रवीण राऊत यांनी म्हाडामध्ये काम करणाऱ्या बहुतांस सरकारी अधिकाऱ्यांशी विविध फायदे आणि लाभ मिळवण्याच्या हेतूने संपर्क साधला. त्यानंतर एफएसआय बिल्डरला विकला.
प्रवीण राऊत, संजय राऊत आणि राकेश वाधवान यांच्यात संगनमत
प्रवीण राऊत, संजय राऊत आणि राकेश वाधवान यांच्यात संगनतमत होतं असंही ईडीने त्यांच्या आरोपपत्रात म्हटलं होतं. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प ७४० कोटींचा असून त्यात प्रवीण राऊत यांना १८० कोटी मिळाले आहेत असं प्रवीण राऊत यांनी त्यांच्या जबाबात म्हटलं आहे. याचा आधार घेत संजय राऊत यांना या गुन्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाले असाही अंदाज ईडीने व्यक्त केला आहे.
या संपूर्ण घोटाळ्यात संजय राऊत यांनी अनेक मालमत्ता विकत घेतल्याचं समोर आलं आहे. तसंच त्यांनी हा पैसा व्यक्तीगत कामासाठी वापरल्याचंही कळतं आहे. संजय राऊत यांना जे पैसे मिळाले त्याचा स्रोत प्रवीण राऊत होते. त्यांना हे पैसे गुरू आशिष कंपनीकडून मिळाले होते
सुरूवातीला १३.८ एकरचा असलेला हा प्रकल्प त्यानंतर ४७ एकरचा झाला असंही समोर आलं आहे. संजय राऊत यांना याच प्रकरणात आता ४ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT