सातारा जिल्हा बँकेची निवडणुक महाराष्ट्रात चांगलीच गाजली. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, शिवसेनेचे विद्यमान मंत्री शंभुराज देसाई यांना या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे जिल्ह्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. राष्ट्रवादीतल्या नाराजांचा हाताशी धरुन शिवेंद्रराजेंनी सूत्र जुळवून आणली आणि शशिकांत शिंदेंचा पराभव झाला. परंतू ज्या बँकेसाठी शिवेंद्रराजेंनी इतकी मेहनत घेतली, त्या अध्यक्षपदाने यंदा शिवेंद्रराजेंना हुलकावणी दिली आहे.
ADVERTISEMENT
नितीन पाटील यांची अध्यक्षपदी तर अनिल देसाई यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
अमोल कोल्हे लोकप्रियतेमुळे नाही तर निष्ठावंतांमुळे खासदार झाले – NCP आमदाराचा घरचा आहेर
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजप आमदार शिवेंद्रराजेंनी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. शिवेंद्रराजे भोसले बँक खूप चांगली चालवतात व भविष्यात देखील चालवतील म्हणून दोन्ही पवारांनी त्यांना हिरवा कंदीलही दाखवला. परंतू शिवेंद्रराजेंच्या नावाला राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील आणि इतर काही नेत्यांनी विरोध केल्याचं कळतंय.
यानंतर अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव पुढे करण्यात आलं आणि शिवेंद्रराजेंचं नाव मागे पडत गेलं. गेल्या महिन्याभरापासून शिवेंद्रराजेंनी केलेली मोर्चेबांधणी यानिमीत्ताने फेल ठरली आहे. शशिकांत शिंदेंच्या पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा एक गट शिवेंद्रराजेंवर नाराज असल्यामुळे ऐनवेळी त्यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकलं गेल्याची चर्चा सुरु आहे.
शिवेंद्रराजेंच्या नावाला दोन्ही पवारांची संमती असुनही नेत्यांच्या नाराजीपुढे त्यांचा नाईलाज झाल्याचं कळतंय. अखेरीस रामराजे नाईक-निंबाळकरांनी स्वतः शिवेंद्रराजेंची मनधरणी करत नितीन पाटील आणि अनिल देसाई यांच्या नावावर एकमत घडवून आणलं. सातारा जिल्हा बँक निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, शशिकांत शिंदेंचा पराभव आणि आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधामुळं शिवेंद्रराजेंचं अध्यक्षपद हुकल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT