सातारा: सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी पाच जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात एकाच दिवशी तब्बल पाच जणांनी आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
जिल्ह्यातल्या विविध भागातल्या पाच जणांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. 24 तासात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सातारा जिल्हा पुरताच हादरुन गेला आहे. कौटुंबिक आणि आजारपणाला कंटाळून या पाचही जणांनी आत्महत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्या केलेले पाचही जण 40 वर्षांच्या खालील आहेत.
आत्महत्या केलेल्यांची व्यक्तींची नावं
-
गणपत कणसे – (वय 35 वर्ष) रा. विहे, पाटण
-
सुमित गायकवाड- (वय 28 वर्ष) रा. वडगाव हवेली, कराड
-
अमोल पाटील- (वय 37 वर्ष) रा. सुपने, कराड
-
अक्षय इंगवले- (वय 27 वर्ष) रा. किडगाव, सातारा
-
पोपट ढेडे- (वय 40 वर्ष) रा. वाई, भुईज
वाई तालुक्यातील भुईज येथील पोपट जनार्दन ढेडे यांनी वाईतल्या एमएसईबीच्या पाठीमागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. तर सुमित सुरेश गायकवाड या तरुणानं घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
तर अमोल निवासराव पाटील यानं एका जनावरांच्या शेडमध्ये गळफास घेतला आणि आपलं जीवन संपवलं. तर गणपत कणसे यांनी आजारपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. अक्षय हिंदूराव इंगवले या 27 वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
कल्याण: दुर्गाडी पुलावरून खाडीत उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या
जिल्ह्यात एकाच वेळी पाच आत्महत्येच्या घटना समोर आल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे. साध्या-साध्या घटनांमुळे व्यक्ती आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत असल्याने समाजाला खऱ्या अर्थाने प्रबोधनाची गरज असल्याचं समोर येत आहे. कोणत्याही समस्येवर आत्महत्या हे उत्तर असू शकत नाही. त्यामुळे अशा घटनांना आळा बसावा यासाठी आता पोलिसांसह प्रशासनाला देखील योग्य ती पावलं उचलावी लागतील तरच या घटना आटोक्यात येतील.
ADVERTISEMENT