सातारा: साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात दुफळी निर्माण झाली आहे. आज (16 नोव्हेंबर) या संपाला गालबोट लागलं आहे. एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकालाच मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
एसटीचा संप सुरू असताना वाहक राजू पवार हे शिवशाही बस पुण्याला घेऊन गेले होते. यावर साताऱ्यातील इतर संपकरी कर्मचाऱ्यांनी बस का घेऊन गेला? अशी विचारणा केली. यावेळी वाहक राजू पवार यांची इतर एसटी कर्मचाऱ्यांशी किरकोळ बाचाबाची झाली होती. दरम्यान, या वादाचं थेट मारहाणीत पर्यवसन झालं.
वादादरम्यान, सातारा आगारातील वाहक क्रमांक 6623 राजू पवार याने चिडून वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यातच दगड घातला. ज्यामध्ये अमित चिकणे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या सगळ्या प्रकरामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस तात्काळ दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या वाहकास ताब्यात घेतलं. तसंच त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे शासनाकडे विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या 19 दिवसापासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे प्रवासी सेवा ठप्प झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बस बंद असल्याने प्रवासी वाहतूक ठप्प झाली आणि परिणामी एसटीलाही कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
28 ऑक्टोबर पासून हा संप चालू आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर आहे असं सांगितले होते. आंदोलकांनी कामावर यावे असा आदेश दिला होता.
ST Workers Strike : कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा लोकांना वेठीस धरू नये-अनिल परब
महाराष्ट्र शासनाने विलिनीकरणाची मागणी वगळता कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्या मंजूर करण्यात येतील. असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीविषयी ठाम आहेत. त्यामुळेच हा संप अद्यापही कायम आहे. मध्यंतरी काही संघटनांनी संप सुद्धा मागे घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकमत न झाल्याने संप अद्यापही सुरू आहे.
संघर्ष एस.टी. कामगार युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी कामगारांना कमिटी कमिटी खेळण्यात स्वारस्य नसल्याचे म्हटले. समिती नेमून काहीही साध्य होणार नसून मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन विलिनीकरणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी शशांक राव यांनी केली आहे. एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलिनीकरण होईपर्यंत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शशांक राव यांनी म्हटले.
ADVERTISEMENT