महाराष्ट्रात आणि पुण्यात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी नियमवाली बदलण्यात येते आहे. या नव्या संकटामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात आला आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने महोत्सव व्हावा अशी रसिकांची प्रबळ इच्छा होती परंतु महोत्सवाची भव्यता, व्याप्ती आणि आयोजनासाठी लागणारा वेळ बघता सद्य परिस्थितीत महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचे जोशी यांनी सांगितलं आहे.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने व्हावी, या भावनेने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्य सरकारची जी नियमावली प्रचलित असेल त्याचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी 13 डिसेंबरला दिली होती. मात्र हा महोत्सव आता रद्द करण्यात आला आहे.
गायन-वादन आणि नृत्य असा संगीताचा त्रिवेणी संगम घडविणारा, देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान मिळवून देणारा आणि जगभरातील संगीतप्रेमींना आकर्षित करणारा हा सवाई गंधर्व संगीत महोत्सव म्हणजे विद्येचे माहेरघर असलेल्या सांस्कृतिक पुण्याचे केवळ भूषणच नाही, तर पुण्याच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा ‘ब्रँड’च झाला आहे. कोणत्याही कलाकाराला ‘सवाई’च्या स्वरमंचावरून कलाविष्कार सादर करण्यामध्ये जीवनाची सार्थकता वाटते यामध्येच या महोत्सवाच्या यशाचे गमक सामावले आहे.
महोत्सवात दरवर्षी आमंत्रित केल्या जाणाऱ्या कलावंतांमध्ये ज्येष्ठ कलाकार आणि नवोदित प्रतिभाशाली कलाकार यांचा संगम असतो. तरुण कलाकाराला या महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळणे म्हणजे कलाकार आपल्या क्षेत्रात एका ठराविक उंचीवर पोचला आहे, असे मानले जाते. कलाकाराबद्दलची माहिती, तो सादर करणार असलेल्या रागाबद्दल आणि त्यातील बंदिशीबद्दलची सविस्तर माहिती देणे हे सवाई महोत्सवात अगदी न चुकता होते. त्याचा परिणाम म्हणजे गाणे ऐकताना राग न कळल्यामुळे येणारी अस्वस्थता या महोत्सवाच्या मंडपात दिसत नाही. उलट नंतर पुन्हा कधीतरी तोच राग वेगळ्या कलाकाराकडून ऐकताना ‘सवाई’मधील त्या मैफलीची हटकून आठवण होते. अशा कितीतरी कलाकारांचे स्वरदर्शन महोत्सवाच्या स्वरमंचावरून झाले आहे. हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, पं. संगमेश्वर गुरव, गंगुबाई हनगळ, पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी यांच्यासारखे सवाई गंधर्वाचा वारसा पुढे नेणारे कलाकार रसिकांचे कान तृप्त करीत राहिले. मात्र यावर्षी हा महोत्सव कोरोनामुळे होऊ शकणार नाही.
ADVERTISEMENT