महाराष्ट्रातील शाळा कोरोना काळामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद होत्या. त्या उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण भागातल्या शाळा विद्यार्थ्यांसाठी उघडल्या जाणार आहेत. यासंदर्भातली तारीख आधीच जाहीर झाली होती. सरकारने आता मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
ADVERTISEMENT
काय आहेत मार्गदर्शक सूचना?
17 ऑगस्टपासून शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरक्षित पणे सुरू केले जातील
मुंबई, ठाणे या शहरांमधील कोव्हिडची परिस्थिती विचारात घेऊन संबंधित महापालिका आयुक्तांना याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार
अन्य जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी योग्य परिस्थिती पाहून निर्णय घेणार
महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत स्तरावर समिती गठित करण्याच्या सूचना
समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी शहरात किंवा गावात कमीत कमी एक महिना कोव्हिडचा प्रादुर्भाव नाही हे बघावे
शिक्षकांचं लसीकरण झालेलं आहे ना हे तपसावे
गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही
कोव्हिडच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जाणार
विद्यार्थी कोव्हिडग्रस्त आढळला तर शाळा बंद करून निर्जंतुकीकरण करणे
शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात किंवा शहरात करावी
कोरोना काळात राज्यातील शाळा पूर्णपणे बंद असल्याने लाखो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. कोरोनाचा वाढता संसर्ग, पहिली लाट आणि दुसरी लाट या दोन्ही दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या. आता कोरोनाचं प्रमाण काहीसं नियंत्रणात येत असल्याचं दिसत असल्यामुळे राज्यात शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाचे निर्बंध लागू आहेत. कोरोनाच्या स्थानिक परिस्थितीनुसार कोरोनाचे निर्बंध देखील काही ठिकाणी शिथील तर काही ठिकाणी कठोर अशा स्वरूपाचे आहेत. कोरोना रूग्णसंख्या कमी झालेल्या राज्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. त्यासाठी कोरोनाच्या रूग्णांची संख्या आणि इतर अटी घालून दिल्या आहेत. आता त्यामध्ये अधिकच्या वर्गांचा समावेश करण्यात आला आहे.
6 ऑगस्यटला काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
‘येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातल्या शाळा आम्ही पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत. कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाली आहे अशा ठिकाणी पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू केल्या जातील. त्यासोबत शहरी भागात म्हणजेच महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या समितीप्रमाणेच शहरी भागांसाठीही समितीची नियुक्ती करण्यात येईल’
ADVERTISEMENT