कोरोनाच्या बंद असलेल्या शाळा सुरु करण्याचाच निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केला. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दलची माहिती दिली. ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार असून, ग्रामीण आणि शहरी भागातील वेगवेगळे वर्ग सुरू होणार आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर घ्यावयाच्या काळजीबद्दल नियमही राज्य सरकारनेे तयार केले आहेत.
ADVERTISEMENT
सध्याच्या घडीला ग्रामीण भागांत पाचवी ते १२ वी तर शहरी भागात आठवी ते १२ वीचे वर्ग भरणार आहेत.
शाळा सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता नियमावली तयार केली आहे. शाळा, पालक, विद्यार्थी आणि संबंधित सर्व घटकांना या नियमावलीचं पालन करावं लागणार आहे.
जाणून घेऊयात काय आहे सरकारची ही नवीन नियमावली? –
१) प्रत्येक शाळेत शक्य असल्यास हेल्थ क्लिनीक सुरु करावं.
२) विद्यार्थ्यांचं नियमीत टेम्प्रेचर चेक केलं जावं.
३) शक्य असल्यास यासाठी इच्छूक डॉक्टरांची मदत घ्यावी.
४) सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात.
५) हेल्थ क्लिनीकसाठी स्थानिक आरोग्य केंद्रातले डॉक्टर आणि परिचारिकांची मदत घ्यावी
६) या कामासाठी लागणारा निधी CSR फंडातून खर्च करावा.
याव्यतिरीक्त मुलांसाठी आणि पालकांसाठीही यात काही खास सूचना देण्यात आल्या आहेत –
१) मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहन द्यावं.
२) ज्या शाळांमध्ये खासगी स्कूलबस, वाहनांनी विद्यार्थी येतात अशा वाहनांमध्ये एका सिटवर एक विद्यार्थी बसून प्रवास करेल याची काळजी घेतली जावी.
३) विद्यार्थी बसमध्ये चढताना आणि उतरताना वाहनचालक किंवा वाहकाने विद्यार्थ्यांना सॅनिटायजरचा वापर करण्यासाठी प्रोत्साहीत करावं.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी यात खास सूचना देण्यात आल्या आहेत –
१) जेवण व इतर बाबी केल्यानंतर साबणाने किंवा सॅनिटायजरे हात धुण्याची विद्यार्थ्यांना आठवण करुन द्यावी.
२) वह्यांची अदलाबदल होणार नाही यासाठी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास सांगावं.
३) वेळ असल्यास शक्यतो गृहपाठ वर्गातच करुन घ्यावा.
४) सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत.
५) कोरोनाची परिस्थिती सर्वसामान्य झाली की खेळ सुरु करायला हरकत नाही तरीही असे खेळ खेळत असताना आवश्यक ती काळजी घ्यावी.
६) खेळाचं साहित्य सॅनिटाईज करावं.
७) खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेषकरुन दमलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं.
८) विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्क आणि दोन मीटरचं अंतर असावं.
९) जवळचे संबंध येणारे खो-खो, कबड्डी असे खेळ टाळावेत.
याचसोबत एखाद्या विद्यार्थ्याच्या वागणुकीत बदल झाला असेल किंवा त्याला ताप-सर्दी, खोकला, श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर त्याला तात्काळ डॉक्टरांकडे नेण्याची सोय करावी. सतत चिडचिड करणाऱ्या, वर्गात शांत बसून राहणाऱ्या-कोणत्याही गोष्टीत स्वारस्य न दाखवणाऱ्या, खाण्याच्या व झोपण्याच्या सवयीत बदल दर्शवणाऱ्या, असहाय्य-सतत रडणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. तसेच पहिल्या दोन आठवड्यांत विद्यार्थ्यांना शाळेची सवय व्हावी यासाठी थेट अभ्यासावर भर न देण्याचाही सल्ला शिक्षकांना देण्यात आला आहे.
School Reopening : अखेर शाळांची घंटा वाजणार! मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा कंदील
ADVERTISEMENT