ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यात एका विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी प्रकाश आमटे आले होते. त्यानंतर त्यांना ताप तसंच खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
प्रकाश आमटे यांच्या विविध तपासण्या सुरू झाल्या आहेत. त्यांना पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे. डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांशी सध्या संपर्क साधू नये असं आवाहनही करण्यात आलं आहे.
प्रकाश आमटे हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसंच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांचे ते पुत्र आहेत. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचलं आहे.
महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गोंड समाजासाठी आणि शेजारच्या मध्य प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये लोक बिरादरी प्रकल्पाच्या रूपात सामाजिक उपक्रम राबवला आहे. त्याची नोंद अनेकदा घेण्यात आली आहे. या सामाजिक कार्याबद्दल त्यांना मॅगेसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.
२०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात बिल गेट्स यांच्या हस्ते ICMR जीवन गौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. प्रकाश आमटे यांनी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी ते शिकत असताना त्यांचा परिचय मंदाकिनी आमटेंसोबत झाला. त्यानंतर या दोघांचा विवाह झाला. मंदाकिनीही त्यांच्यासोबत या सामाजिक कार्यात सहभागी झाल्या.
बाबा आमटे यांचा समाजसेवेचा वारसा प्रकाश आमटे यांनी जपलाच नाही तर तो आणखी समृद्धही केला. प्रकाश आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९४८ ला झाला. प्रकाश आमटे यांच्या आईचं नाव साधनाताई होतं. त्यांनीही बाबा आमटे यांच्या कार्याला वाहून घेतलं होतं.
बाबा आमटे यांनी त्यांचं आय़ुष्य कुष्ठरोग्यांसाठी वेचलं. बाबांचं कार्य प्रकाश आमटे यांनी लहानपणापासून पाहिलं होतं. त्यामुळे तेच संस्कार त्यांच्यावरही झाले. याच प्रकाश आमटे यांच्या आयुष्यावर एक सिनेमाही निघाला होता. ज्याचं नाव होतं प्रकाश बाबा आमटे. या सिनेमात प्रकाश आमटे यांची भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली होती.
ADVERTISEMENT