नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुपारी दिली होती असा खळबळजनक आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. या आशयाचं एक ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांना नक्षल्यांकडून जिवे मारण्याची धमकी आलेली असताना त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यास उद्धव ठाकरेंनी नकार दिला असा आरोप शिंदे गटाकडून होतो आहे. अशात नितेश राणे यांचं हे ट्विट समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे नितेश राणे यांनी ट्विट मध्ये? उद्धव ठाकरेंवर काय आरोप केला?
एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच जेव्हा माझ्या वडिलांनी शिवसेना सोडली तेव्हा सोबर आणि सभ्य वाटणाऱ्या पक्षप्रमुखांनी त्यांना मारण्यासाठी अनेकांना सुपारी दिली होती. जरा ही म्याँव म्यांव संपूदे त्यानंतर आम्ही योग्य प्रकारे वस्त्रहरण करू. सगळ्या गोष्टींची सव्याज परतफेड केली जाईल या आशयाचं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
नितेश राणेंनी काय म्हटलं आहे?
माझ्या वडिलांना सुपारी देऊन संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली होती. नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी गडचिरोली आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत जो उल्लेख केला. एकनाथ शिंदेंना सुरक्षा पुरवू नका हे वर्षावरून कसं सांगितलं गेलं हे त्यांनी सांगितलं. या प्रकारचे अनुभव आम्हालाही आले आहेत.
सोज्ज्वळ, आजारी हे काय त्यांना दाखवलं जातं आहे त्यांचा इतिहास, त्यांची मानसिकता काय आहे? हे लोकांना कळलं पाहिजे म्हणून मी ट्विट केलं आहे. अनेक असंख्य घटना याआधी घडल्या आहेत. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही व्यवस्थित वस्त्रहरण करणार आहोत. उद्धव ठाकरेंची एक वेगळी प्रतिमा घडवली जाते आहे. सोज्ज्वळ, आजारी आहे सभ्य आहे. मात्र जो माणूस सुपाऱ्या देत असेल तर महाराष्ट्राला ती बाजूही कळली आहे. हा प्रश्न फक्त एकनाथ शिंदे यांच्यापुरता मर्यादित नाही.
काही कारणामुळे शिवसेना सोडली तर त्या व्यक्तीसोबत केलं जातं ते महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आत्ता त्यांचे सुपुत्र महाराष्ट्रात फिरून उद्धव ठाकरे किती चांगले आहेत हे सांगत आहेत. त्यांची खरी बाजू काय आहे ती लोकांना कळली पाहिजे. स्वतःचे वडील आजारी आहेत म्हणून यांना चिंता वाटते, दुसऱ्यांच्या वडिलांना जेवताना उठवलं होतं ते हे लोक विसरून गेले, अटक करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे जी काही माहिती आहे ती लोकांसमोर योग्य वेळी येईल असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या फोनमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT