मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. त्यांच्या सभेची राज्यभरात चर्चा आहे. अशात या सभेच्या एक दिवस आधीच शरद पवारांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. नाव न घेता त्यांनी राज ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत शरद पवार?
मध्यंतरी एका नेत्याने माझ्यावर टीका केली की मी फुले आंबेडकर, शाहूराजा यांचं केवळ नाव घेतो. मी त्यांना विचारू इच्छितो.. फुलेंचं नाव का मी घ्यायचं नाही? ज्यांनी समाजाला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला ज्यांच्या पत्नीने आपलं आयुष्य लोकांच्या शिक्षणासाठी घालवलं त्यांचं नाव घ्यायचं नाही. ज्यावेळी इंग्रज सरकार होतं त्यावेळी इंग्रज राजा महाराष्ट्रात आला होता त्यावेळी ज्योतिबा फुले यांनी स्वतः त्या राजाला एक निवेदन दिल होत त्यामध्ये लिहिलं होतं. दुष्काळ पडला आहे त्यामुळे आम्हाला खडी फोडण्याची शिक्षा देऊ नका. त्यऐवजी राज्यात धरणे बांधा. त्यांना दूरदृष्टी होती.
औरंगाबादमध्ये भोंगे वाजवण्यासाठी मनसे सज्ज, जाणून घ्या काय आहे मनसेचा R प्लान?
शाहू महाराज सामान्यांचे राजे होते. ते शहरात कधीही राहिले नाहीत. गोरगरीबाला भेटत असत. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. आधुनिकेतचा विचार करणारे शाहू महाराज होते. त्यांचं नाव का घ्यायचं नाही? ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान तयार केलं त्यांचं नाव का घ्यायचं नाही? यासोबतच आणखी एक महत्त्वच काम केलं ते म्हणजे ते ज्यावेळी ते देशाचे जलसंपदा मंत्री होतें त्यावेळी त्यानी देशात मोठी धरणे बांधली. वीज निर्मिती केंद्रे उभारली.
सध्या राज्यात जात धर्माचा वापर करून लोकांना आणखी मागे घेऊन जायचा प्रयत्न सुरु आहे. जे मूळ प्रश्न आहेत ते बाजूला सारून धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे सगळे सुरु असताना आपला मूलभूत प्रश्न सुटणार आहे का. केवळ सर्वांना मूलभूत प्रश्नांकडून बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
राज्यासाठीची दूरदृष्टी असलेल्या महात्मा फुलेंचं नाव का घ्यायचं नाही?
राज्यातल्या गोरगरीबांसाठी झटणाऱ्या शाहू महाराजांचं नाव का घ्यायचं नाही?
देशाचं संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घ्यायचं नाही?
हे तीन प्रश्न शरद पवारांनी राज ठाकरेंना विचारले आहेत. त्यांना राज ठाकरे उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
“शरद पवार यांची एक मुलाखत घेतली होती पुण्यात. त्यावेळी त्यांचं वय पाहून मी फार खोलात गेलो नाही. शरद पवार जेव्हा जेव्हा भाषण करतात राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून त्यावेळी ते म्हणतात हा महाराष्ट्र शाहू, फुले आंबेडकरांचा आहे. मान्यच आहे. पण त्याआधी हा महाराष्ट्र सर्वप्रथम कुणाचा असेल तर तो आमच्या छत्रपती शिवरायांचा आहे.”
“मात्र शरद पवार कधीही छत्रपतींचं नाव घेताना तुम्हाला कुठल्याही सभेत दिसणार नाहीत. छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर जर मुस्लिम मतं गेली तर काय करायचं? त्यामुळेच ते शाहू, फुले, आंबेडकर असाच उल्लेख करतात. छत्रपतींवरचं राजकारण करायचं असेल, मराठी बांधवांची माथी भडकवायची असतील तर ब्राह्मणांनी पुस्तकं लिहिलीत, मग इतरांनी काहीतरी लिहिलं. अफझल खान इथे आला होता त्यावेळी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला पण त्यात हिंदू मुस्लिम असं काही नव्हतं हे पवार म्हणाले आहेत. मग तो कशासाठी आला होता? तो काय केसरी टूर्सचं तिकिट घेऊन आला होता का? ” असं विचारत राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली होती.
ADVERTISEMENT