गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. गुजरातमध्ये पाशवी बहुमत मिळवत भाजपनं पुन्हा एकदा सत्ता राखली आहे, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या जे.पी. नड्डा यांचं गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात पक्षाला सत्ता गमावावी लागली आहे. या विधानसभा निवडणूक निकालांचे वेगवेगळे अर्थ लावले जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी या निकालांचा वेगळा अर्थ विशद केला आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना शरद पवारांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भूमिका मांडली.
शरद पवार म्हणाले, “गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल, याबद्दल कुणाच्या मनात शंका नव्हती. सगळी देशाची सत्ता त्याठिकाणी वापरली. अनेक निर्णय एका राज्याच्या सोयीचे घेतले गेले. अनेक प्रकल्प त्या राज्यात येतील कसे, याबद्दल काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम शेवटी हा होणार याबद्दल कुणाच्या मनात शंका नव्हतीच. त्यामुळे तसा निकाल त्याठिकाणी लागला.”
“गुजरातचा निकाल लागला याचा अर्थ देशामध्ये एका बाजूला मतप्रवाह जातोय, हे खरं नव्हे. त्याचं उत्तर उदाहरण दिल्ली महापालिकेत तिथल्या जनतेनं दाखवलं. जवळपास 15 वर्ष दिल्ली महापालिकेची सूत्रं भाजपकडे होती, ती आता राहिलेली नाही. अशा अनेक गोष्टी सांगता येतील”, असं म्हणत शरद पवारांनी निकालाचा अर्थ सांगितला आहे.
शरद पवार गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काय म्हणाले?
“हिमाचलं प्रदेशची निवडणूक झाली. मतमोजणी झाली. हिमाचल प्रदेशात भाजपचं राज्य होतं. आताची जी माहिती आहे, ती भाजपनं 27 जागा मिळवल्या आणि काँग्रेस पक्षाने 37 जागा मिळाल्या. आज त्या ठिकाणी भाजपचं राज्य गेलं. दिल्लीतलं गेलं. पंजाबमध्ये ते नव्हेतच. आता हिमाचलमध्ये त्याचं राज्य होतं, तेही राज्य गेलं. याचा अर्थ हळूहळू बदल व्हायला लागला आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“राजकारणामध्ये पोकळी असते. खुपदा. गुजरातची पोकळी भाजपने भरून काढली आणि दिल्लीची पोकळी ही केजरीवालांनी भरून काढली आहे. आज अनेक ठिकाणी लोकांना बदल हवे आहेत. पण, ते बदल हवेत याची नोंद राजकीय कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. ती पोकळी भरून काढायची कशी, यासाठी आवश्यक ते कार्यक्रम घेतले पाहिजे”, असं सांगत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे पक्षातील कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.
गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल : पवारांनी सांगितली महाराष्ट्रातील स्थिती
शरद पवार म्हणाले, “आज महाराष्ट्रात माझं स्पष्ट मत आहे की, पोकळी मोकळी आहे. ती पोकळी आहे, त्या पोकळीला सामोर जायची आणि पर्याय द्यायची ताकद एकाच पक्षात आहे, तो तुमच्या (राष्ट्रवादी काँग्रेस) पक्षात आहे. आज अन्य पक्षात ते कितपत शक्य आहे, याबद्दल मी भाष्य करू इच्छित नाही. कारण यातील अनेक पक्ष असे आहेत की, ज्यांना आपल्याला सोबत घेऊन राजकारण करायचं आहे.”
पुढे बोलताना शरद पवारांनी सांगितलं की, “त्यामुळे आपण भाजपच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध असलेल्या शक्ती एकत्रित करण्यासाठी आणि त्या एकत्र करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कसं प्रोत्साहित करता येईल, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत जिल्हा पातळीपासून राज्याच्या पातळीपर्यंतचे पदाधिकारी कशी महत्त्वाची भूमिका घेतात, हे पाहण्याची गरज आहे”, अशी भूमिका शरद पवारांनी गुजरात विधानसभा निवडणूक आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मांडली.
ADVERTISEMENT