राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं आहे की दोन दिवसांपूर्वी न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आंदोलन यशस्वी झालं म्हणून गुलाल उधळून, पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा उद्देश काय होता? हे पोलीस यंत्रणचं अपयश आहे. पोलिसांना आधी कसं कळालं नाही? असा प्रश्नही अजित पवार यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
सिल्व्हर ओकवर मीडिया पोहचला त्यांनी हल्ला कसा झाला ते दाखवलं. मीडियाचं ते कामच आहे मात्र जे मीडियाला कळलं ते पोलिसांना कसं कळलं नाही? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. अजित पवार म्हणाले की पोलीस विभाग मागे कोण सूत्रधार आहे त्याचा शोध घेतील. एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्यात आली होती. त्यामागे कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. आम्ही आंदोलकांसोबत आणि संघटनांसोबतही अनेकदा बैठका घेतल्या आहेत. एसटी कर्मचारी संघटनांचं देखील ऐकत नाही आहेत. त्यांनी तारतम्य सोडलं, जी भाषा वापरण्यात आली ती आपल्या संस्कृतीत बसत नाही. पोलीस यंत्रणा याचा तपास करुन यामागे कोण मास्टरमाईंड आहे याचा शोध घेतील.’
आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. यावेळी दगडफेक आणि चप्पलफेकही करण्यात आली. मोठा गदारोळही पाहण्यास मिळाला. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर तणाव निर्माण झाल्याचं चित्र होतं. मात्र सुप्रिया सुळे पुढे आल्या आणि त्यांनी सगळी परिस्थिती हाताळली. तसंच जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देत सगळ्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. या आंदोलनानंतर आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातही ठिय्या दिला मात्र त्यांना तिथून बाहेर काढण्यात आलं आहे. आता अजित पवार यांची या प्रकरणी प्रतिक्रिया समोर आली असून पोलीस कुठे तरी कमी पडले असं त्यांनी म्हटलं आहे. या सगळ्याला आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT