शरद पवार राष्ट्रपती? Prashant Kishor यांच्या दिल्लीतल्या गाठीभेटींची Inside Story

मुंबई तक

• 09:51 AM • 14 Jul 2021

प्रशांत किशोर हे नाव म्हणजेच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. प्रशांत किशोर यांनी गांधी कुटुंबाची भेट घेतली आहे. प्रशांत किशोर यांनी गेल्या महिन्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. पुढच्या वर्षी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी ते शरद पवार यांचा प्रचार करतील. त्यांना प्रोजेक्ट करतील अशा चर्चा झाल्या होत्या. […]

Mumbaitak
follow google news

प्रशांत किशोर हे नाव म्हणजेच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. प्रशांत किशोर यांनी गांधी कुटुंबाची भेट घेतली आहे. प्रशांत किशोर यांनी गेल्या महिन्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. पुढच्या वर्षी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी ते शरद पवार यांचा प्रचार करतील. त्यांना प्रोजेक्ट करतील अशा चर्चा झाल्या होत्या. मात्र अशी काही बातमी नाही, हे फक्त कल्पनेत आहे असं म्हणत प्रशांत किशोर यांनीही शक्यता फेटाळून लावली. आता मात्र त्यांनी गांधी कुटुंबीयांची भेट घेतली आहे. ही भेट राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याबाबतच जाणून घेऊया सविस्तर.

हे वाचलं का?

साहिल जोशी: प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? त्यांनी ही भेट का घेतली असावी? शरद पवार यांच्याशी भेट झाली होती राजदीपजी तेव्हा तुम्ही त्यांना भेटला होतात. मात्र तेव्हा काँग्रेस हायकमांडची भेट घेतील असं काही नव्हतं. आता त्यांनी गांधी कुटुंबीयांची भेट घेतली आहे याकडे तुम्ही कसं बघता?

राजदीप सरदेसाई : बंगाल निवडणुकीच्या दिवशी आम्ही प्रशांत किशोर यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली होती की मी यापुढे रणनीतीकार म्हणून काम करणार नाही. कुठल्याही पक्ष किंवा व्यक्तीसाठी मी रणनीतीकार म्हणून काम करणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यांनी हे सांगण्याचाच प्रयत्न केला होता की मी सेकंड इनिंगमध्ये मी राजकीय पक्षात जाऊ शकतो. मी त्यांना हा प्रश्न विचारला होता. त्यांनी त्याबद्दल उत्तर देणं नाकारलं नाही. बिहारमध्ये त्यांना त्यांचा स्वतःचा पक्ष स्थापन झाला आहे. मात्र आता काँग्रेस पक्षाच्या तीन महत्त्वाच्या नेत्यांना त्यांनी भेटणं हे महत्त्वाचं दिसतं आहे. ही पहिली बैठक नाही आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ही दुसरी किंवा तिसरी भेट आहे. प्रियंका, राहुल आणि सोनिया गांधी या तिघांची भेट प्रशांत किशोर यांनी घेतली. काँग्रेस ही संघटना संपल्यात जमा आहे असं काही लोक म्हणत आहेत. या पक्षाला नवी भरारी घेण्यासाठी काय करावं लागेल याबाबत या तिघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं आहे. पक्ष बळकट करायचा असेल तर काय करायचं? ही चर्चा या तिघांमध्ये झाली आहे. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार की बाहेरून त्यांना मदत करणार हे अद्याप नक्की व्हायचं आहे. पॉलिटिकल मॅनेजमेंट करणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये सहभागी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काँग्रेस ही एकमेव पार्टी आहे जी भाजपला टक्कर देऊ शकते असं प्रशांत किशोर यांना वाटतं आहे. जर मी काँग्रेसमध्ये गेलो तर मला पदही मिळू शकतं असंही प्रशांत किशोर यांना वाटतं आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी लगेच होणार नाही. पण त्या दिशेने हा प्रवास सुरू झाला आहे असं दिसतं आहे.

साहिल जोशी : दिल्लीत दोन चर्चा सुरू आहेत ते म्हणजे राष्ट्रपती म्हणून शरद पवार यांचं नाव चर्चेत आहे. तर आता दुसरी चर्चा रंगते आहे की ते कदाचित काँग्रेसमध्ये जातील. प्रशांत किशोर हे अत्यंत महत्वाकांक्षी आहेत. त्यांनी आप, जनता दल युनायटेड यांच्याकडे त्यांनी अटी घातल्या होत्या. ज्या मान्य झाल्या नाहीत. आता काँग्रेसच्या सेटअपमध्ये काम करू शकतील का? त्यात कितपत यशस्वी होतील प्रशांत किशोर?

राजदीप सरदेसाई: हा खरंच मोठा प्रश्न आहे.. कारण हे आत्ता उत्तर देता येणार नाही. 2017 मध्ये असा एक प्रयत्न झाला होता त्यावेळी प्रशांत किशोर यांना वाटलं होतं की आपल्याला चांगलं पद काँग्रेसमध्ये मिळेल पण ती बोलणी यशस्वी झाली नाहीत. काँग्रेसची एकदंरीत जडणघडण आणि धाटणी अशी आहे की कुणीही नेता बाहेरून आला आणि मोठ्या पदावर जाऊन बसला असं घडत नाही. आजही प्रशांत किशोर यांना वाटत असेल की मी काँग्रेसमध्ये आलो तर मला मोठं पद मिळेल तर हा त्यांचा विचार प्रत्यक्षात येणं कठी आहे. तुम्ही आम आदमी पार्टीमध्ये जाणार असाल तर कदाचित हे शक्य आहे. काँग्रेसमध्ये येऊन लगेच मोठं पद दिलं जाणं हे दिसतं तेवढं सोपं नाही. कारण काँग्रेसमध्ये असा एक मोठा गट आहे जो वरिष्ठ आहे. असं असलं तरीही काँग्रेसलाही असं वाटतं आहे की काँग्रेस आपल्याला आत्ता प्रशांत किशोर हे नवसंजीवनी देऊ शकतात.

साहिल जोशी: प्रशांत किशोर यांना कोणतं पद दिलं जाईल याची जी चर्चा आपण करतो आहोत त्यात अहमद पटेल यांची जागा रिकामी आहे. अहमद पटेल हे काँग्रेसचे संकटमोचक होते. त्यांची जागा प्रशांत किशोर भरून काढू शकतील का?

राजदीप सरदेसाई : अहमद पटेल 40 वर्षे काँग्रेसमध्ये होते. पॅरा ट्रूप करणं हे काँग्रेसमध्ये शक्य नाही. मात्र आज काँग्रेसला आत्ता सगळ्या घटक पक्षांची गरज आहे. उद्या त्यांना आपचीही गरज भासू शकते. अशावेळी प्रशांत किशोर यांच्यासारखा प्रत्येक पक्षाशी चांगले संबंध असलेला माणूस काँग्रेसला जुने दिवस परत मिळवून देईल का हे पाहणं नक्कीच रंजक असणार आहे. काँग्रेस को ऑर्डिनेटर असं पद प्रशांत किशोर यांना दिलं जाऊ शकतं. प्रशांत किशोर यांना लगेच राहुल गांधी यांचं पर्सनल सेक्रेटरी म्हणून नेमलं जाणार नाही. राहुल गांधी यांना काय वाटतं आहे त्यांच्या मनात काय आहे? हा प्रश्नही कायम आहेच. राहुल गांधी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष व्हायला तयार नाहीत. लोकसभेत ते काँग्रेसचे नेतृत्व करायला तयार नाहीत असंही समजतं आहे. अधिररंजन चौधरींच्या जागी कोणताही माणूस येऊ शकतो. नॉन कॅप्टनच्या भूमिकेत जोपर्यंत राहुल गांधी असतील तोपर्यंत प्रशांत किशोर कसं काम करतील त्यांचा वापर कसा केला जाईल? हा प्रश्न कायमच राहणार आहे. प्रशांत किशोर यांना एका नेत्यासोबत थेट संबंध मग ते नरेंद्र मोदी असोत, जगन रेड्डी असोत किंवा अरविंद केजरीवाल.

साहिल जोशी: दिल्लीत सध्या शरद पवार राष्ट्रपती होतील अशी चर्चा किंवा ज्याला गॉसिपही म्हणता येईल असं गॉसिप रंगलं आहे..शरद पवार राष्ट्रपती होतील अशा बातम्याही येत आहेत. याला कारण आहे जून महिन्यात प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटींमुळे. शरद पवार यांचं नाव पुढे येण्याचं कारण काय वाटतं दिल्लीत काय चर्चा आहे?

राजदीप सरदेसाई : प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट झाल्यानंतर काही चर्चा रंगल्या होत्या. शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी ही भेट होती असंही बोललं गेलं. मात्र मंगळवारी जी भेट झाली त्यामध्ये अशी कोणतीही चर्चा झाल्याचं आत्ता तरी समजलेलं नाही. आजच्या तारखेला हा फक्त एक अंदाज बांधला आहे. काँग्रेससोबत झालेली बैठक ही दोन तास शरद पवारांवर झाली आहे मला वाटत नाही. पंजाबवरही चर्चा झालेली नाही. अमरिंदर आणि नवज्योत सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक होत नाही तोपर्यंत शरद पवार राष्ट्रपती होणार की नाही याची चर्चा करण्यात अर्थ नाही. पण यूपी इलेक्शनमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही तर त्यानंतर शरद पवार यांचं नाव समोर येऊ शकतं.

साहिल जोशी – शरद पवारांचा आजवरचा इतिहास आहे की त्यांनी एकही निवडणूक हरले नव्हते. याला दोन अपवाद आहेत. एक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि दुसरी होती ती बीसीसीआयची निवडणूक ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. यावरून त्यांनी धडा घेतला की अशा कोणत्याही निवडणुकीत भाग घ्यायचा नाही की जिथे आपली हार होईल अशा स्थितीत काय घडू शकतं?

राजदीप सरदेसाई –मला वाटतं की ते आधी नंबर्स पाहतील. भाजपला जर उत्तर प्रदेशात कमी सीट मिळाले तर मी प्रयत्न करू शकतो हे शरद पवार यांना माहित आहे. मात्र हे आज काल्पनिक आहे. ते लगेच मैदानात उतरणारे नेते नाहीत. जोपर्यंत हवा बदलते आहे, पूर्णपणे जमीन तयार होत नाही तोपर्यंत शरद पवार या स्पर्धेत उतरतील असं वाटत नाही.

साहिल जोशी – प्रशांत किशोर यांनी अनेक राज्यांमध्ये चमत्कार करून दाखवला, मात्र देशपातळीवर त्यांना त्यांची ही स्ट्रॅटेजी असू शकते? काँग्रेसला पुन्हा नवं बळ मिळवून देणं, विजय मिळवून देणं हे किती मोठं आव्हान असेल प्रशांत किशोर यांच्यासमोर?

राजदीप सरदेसाई : खरंतर हे मत विचारात घेतलं तर खूपच कठीण आहे. प्रशांत किशोर यांच्यासमोर काँग्रेसला नवं रूप मिळवून देणं, उभारी आणि बळकटी देणं खूपच कठीण आहे. प्रशांत किशोर यांना वाटतं आहे की उत्तर प्रदेशनंतर ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये गुजरात, छत्तीसगढ, तेलंगण, हिमाचल अशा सात राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. यातल्या पाच-सहा राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येऊ शकते. अशावेळी काँग्रेसला बळ देण्यासाठी ती परफेक्ट वेळ असू शकते. कारण 2024 त्याचा उपयोग होऊ शकतो. प्रशांत किशोर हे काही जादूगार नाहीत. पश्चिम बंगालची निवडणूक ही काही प्रशांत किशोर यांनी जिंकली नाही ती ममता बॅनर्जींनी जिंकली. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी आणि अखिलेश यादवला एकत्र आणून यूपी के लडके हे अभियानही चालवलं. काय घडलं त्याचं पुढे? ते काही जादूगार नाहीत. ते रणनीतीकार आहेत. त्यामुळे जादूची कांडी फिरवल्यासारखं काँग्रेसची आत्ताची अवस्था ते बदलतील असं नाही होणार. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. दिल्लीत एक हवा आहे की प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये येणार आणि पक्षाला नवी उभारी देणार पण हे काही इन्स्टंट कॉफी बनवण्याएवढं सोपं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रशांत किशोर आले आणि आम्ही जिंकणार असं झालं असं होणार नाही.

साहिल जोशी-प्रशांत किशोर हे शरद पवार यांना सल्ला देत आहेत की तुम्ही दिल्लीत पाच-सहा दिवस राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत?

राजदीप सरदेसाईः प्रशांत किशोर हे सध्या जॉब शोधणाऱ्या मुलासारखे आहेत. त्यांची मोठी स्ट्रॅटेजी तयार नाही. प्रशांत किशोर यांचे लोक ममतांसोबत चांगलं काम करत आहेत त्यांचे चांगले संबंध अनेक नेत्यांसोबत चांगले आहेत. मोदी विरोधात शरद पवारांना उभं करणं, त्यांना पंतप्रधान करणं हे सगळं काही लगेच शक्य नाही. सध्या तरी ते कल्पनेत आहे. पुढे राजकारणात काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असतं.

    follow whatsapp