पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेरीस आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. पुजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवला होता. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी धनंजय मुंडे प्रकरणाची आठवण करुन देत शरद पवार यांना टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
संजय राठोड यांच्याप्रकरणी जे साहस उद्धव यांनी दाखवलंस तेच साहस आता शरद पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणात दाखवायला हवं. काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळेही राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. याप्रकरणातही धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत चालला होता. परंतू यानंतर तक्रारदार महिलेनेच आपली तक्रार मागे घेतल्यानंतर हे प्रकरण शांत झालं.
दरम्यान, संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. पूजा चव्हाणची हत्या आहे की कोणाच्या दबावामुळे केलेली आत्महत्या याचीही चौकशी झाली पाहिजे असं चंद्रकांतदादा म्हणाले आहेत. दरम्यान उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्यासाठी काय रणनिती आखतायत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT