मुंबई: देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. राज्यसभा निवडणूक पार पडल्यानंतर येत्या २० तारखेला राज्यात विधान परिषदेची निवणडूक होणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रपतीपदाची निवडणूक (Presidential Election) जाहीर झाली आहे. येत्या २१ जुलै रोजी देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. या निमित्ताने देशात हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचे नाव चर्चेत होते. काल राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि पुन्हा या चर्चेला बळकटी मिळाली. परंचु आता खुद्द शरद पवारांनीच (Sharad Pawar) आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचे नाव चर्चेत असताना त्यांनी मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत सांगितले की आपण विरोधकांचे उमेदवार नाही. “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असे शरद पवारांनी यावेळी सांगितले. राष्ट्रपतीपदासाठी दुसरे नाव चर्चेत आहे ते गुलाब नबी आझाद यांचे. येत्या १५ तारखेला दिल्लीमध्ये देशातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. याबैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही अशा राज्यांच्या प्रतिनिधींना त्या बैठकीसाठी आमंत्रीत करण्यात आले आहे.
नाना पटोलेंचा जाहीर पाठिंबा, तर आपचा…
शरद पवार यांचे नाव ज्यावेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत आले त्यावेळी शरद पवारांच्या नावाला महाराष्ट्र काँग्रेसने पाठिंबा दिला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले ” जर महाराष्ट्रातील व्यक्ती राष्ट्रपती होत असेल तर आमचा त्याला पाठिंबा राहिल.” त्याचबरोबर आपच्या नेत्यांचीही शरद पवारांसोबत फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. परंतु खुद्द शरद पवारांनी हे नाकारल्याने सर्व चर्चांना ब्रेक लागला आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा संपुर्ण कार्यक्रम
– १५ जून रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसुचना निघणार आहे.
– २९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
– ३० जून रोजी अर्जाची छाननी होवून २ जुलै रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असणार आहे.
– निवडणूक बिनविरोध झाल्यास २ जुलै रोजीच देशाला नवीन राष्ट्रपती मिळणार आहेत.
– निवडणूक बिनविरोध न झाल्यास १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण मतदान करतं?
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्वसामन्य लोकांना मतदान करता येत नाही. या निवडणुकीमध्ये सर्व निवडून आलेले आमदार-खासदार मतदान करु शकतात. मतदारांच्या एकूण मतांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे खासदार आणि आमदारांच्या मतांचे वेटेज प्राप्त करणारा उमेदवार भारताचा राष्ट्रपती होतो.
राष्ट्रपती पदासाठी भाजप कोणता उमेदवार देतं या चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप यंदा महिला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. आणि मुख्य म्हणजे त्या आदिवासी महिला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर ही निवडणूक बिनविरोध नाही झालीतर ही निवडणूक ही रंजक होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT